मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास लांबला आहे. राजस्थानच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली. त्यानंतर मात्र पावसाच्या परतीचा प्रवास खोळंबला. दरम्यान, पुढील एक – दोन दिवसांत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागातून मोसमी वारे माघार घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यंदा नैऋत्य मोसमी पाऊस अंदाजित वेळेआधीच म्हणजे २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मोसमी पावसाने नेहमीच्या वेळेपेक्षा सुमारे दोन आठवडे आधीच महाराष्ट्राची सीमा ओलांडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, तसेच कर्नाटक, गोव्यात मोसमी पाऊस दाखल झाला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी २६ मे रोजी मोसमी पाऊस मुंबई, पुणे आणि आसपासच्या परिसरात दाखल झाला. याचबरोबर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात.
दरम्यान, त्यानंतर जून, जुलै या दोन महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी होते. महिन्यातील दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे सरासरी ओलांडणे शक्य झाले. सप्टेंबर महिन्यात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला. दरम्यान, १४ सप्टेंबर रोजी नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू झाला. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली. आणखी काही भागांमधून मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. यावेळी महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरले, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती.
त्यानंतर बंगालच्या उपसागरात लागोपाठ निर्माण झालेले कमी दाब क्षेत्र, तसेच शक्ती चक्रीवादळ यामुळे मोसमी पावसाचा परतीचा पाऊस लांबला. साधारण १० ते १२ दिवसांपासून पावसाचा परतीचा प्रवास खोळंबला आहे. दरम्यान, पुढील एक – दोन दिवसांत राज्यातून मसोमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू हण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मागील वर्षीचा परतीचा प्रवास
- २३ सप्टेंबर – दक्षिण राजस्थान, कच्छमधून परतीचा प्रवास सुरू
- ५ ऑक्टोबर- महाराष्ट्रातून (नंदुरबार)
- १५ ऑक्टोबर- संपूर्ण दशातून माघार
उकाड्याची जाणीव
गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे उकाडा सहन करावा लागत आहे. मुंबईसह इतर भागातही दिवसभर असह्य उकाडा सहन कारावा लागत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३१.८ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३२.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक
ब्रह्मपुरी येथे गुरुवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३४.८ अंश सेल्सिअस कमाल तापामान नोंदले गेले. त्याखालोखाल चंद्रपूर ३४.४ अंश सेल्सिअस, अकोला ३३.५ अंश सेल्सिअस, वर्धा ३४.४ अंश सेल्सिअस, अमरावती ३४ अंश सेल्सिअस आणि अकोला येथे ३३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.