मुंबई : रेल्वेगाड्यांची मर्यादित संख्या आणि दिवसेंदिवस वाढणारी प्रवासीसंख्या यामुळे प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळत नाही. अत्यावश्यक कामानिमित्त जाण्यासाठी काही प्रवासी प्रतीक्षा यादीतील तिकिटावर रेल्वेगाडीतून प्रवास करतात. परिणामी, आरक्षित तिकीटधारक प्रवाशांची प्रवासादरम्यान गैरसोय होते. याबाबत अनेक प्रवाशांनी तक्रारी केल्यानंतर मध्य रेल्वेने विनाआरक्षित प्रवाशांना रेल्वेगाडीतून प्रवास करण्यास बंदी केली आहे. तर, आरक्षित तिकीट नसलेल्या सुमारे १,६२८ प्रवाशांना गुरुवारी रेल्वेगाडीमधून खाली उतरविण्यात आले.

हेही वाचा : मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लाॅक

भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली असून, त्या तुलनेत रेल्वेगाड्यांची संख्या अपुरी आहे. बहुसंख्य प्रवासी चार महिने आधीच तिकीट काढतात. त्यांना आरक्षित तिकीट मिळते. मात्र, काही नागरिकांना कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागतो. आयत्या वेळी आरक्षित तिकीटे मिळत नाहीत. तसेच तत्काळ तिकीट काढले तरीही अनेकदा ते प्रतीक्षा यादीत असतात. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास रखडतो. यावेळी अनेक प्रवासी जनरल डब्याचे तिकीट काढून शयनयान डब्यातून प्रवास करतात. तसेच काही जण तिकीट खिडकीवरील आणि प्रवासी आयआरसीटीसीच्या ऑनलाइन संकेतस्थळावरून काढलेल्या प्रतीक्षा यादीतील तिकीटांवर प्रवास करतात. त्यामुळे आरक्षित तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास अडचणीचा होत होता. रेल्वेगाडीच्या डब्यात विनाआरक्षित प्रवासी वाढल्याने, आरक्षित तिकीटधारक प्रवाशांना त्यांच्या आसनापासून ते स्वच्छतागृहात जाण्यास गैरसोय होत होती. तसेच या प्रवाशांना रेल्वे डब्यात चढण्यापासून आसनापर्यंत पोहचण्यास खूप कष्ट घ्यावे लागत होते. ही बाब रेल्वेगाडीतून उतरताना होत होती. आरक्षित तिकीटधारक प्रवाशांच्या तक्रारी वाढल्याने, आता मध्य रेल्वेने ऑनलाइनसह तिकीट खिडकीवरून काढलेल्या प्रतीक्षा यादीतील तिकीट घेऊन प्रवास करण्यास मनाई केली आहे.

हेही वाचा : वडाळा – परळदरम्यानच्या जलबोगद्याचे खणन पूर्ण, प्रकल्प पूर्ण होण्यास एप्रिल २०२६ ची मुदत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर भारतात जाणाऱ्या बहुसंख्य रेल्वेगाड्यामधून विनाआरक्षित तिकीटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. यामध्ये २९ एक्स्प्रेसमधून १,६२८ प्रवाशांचा प्रवास खंडीत करण्यात आला. यात महानगरी, कुशीनगर, एलटीटी – गोरखपूर एक्स्प्रेस, गितांजली, पुष्पक, पाटणा व अन्य रेल्वेगाड्यांचा सहभाग होता. गाडी क्रमांक ११०५९ छाप्रा एक्स्प्रेसमधून सर्वाधिक म्हणजे २८२ प्रवाशांना रेल्वेगाडीतून उतरवण्यात आले. त्यानंतर गाडी क्रमांक ११०६१ एलटीटी जयनगर एक्स्प्रेसमधून २०० प्रवाशांना रेल्वेगाडीतून उतरविण्यात आले.