लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईमध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी गुरुवारी सकाळी सुरू झालेला विसर्जन सोहळा तब्बल २८ तासांहून अधिक काळ सुरू होता. गिरगाव चौपाटीवर शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास ‘लालबागच्या राजा’ आणि गिरगाव, डोंगरी, उमरखाडी आणि आसपासच्या परिसरातील मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले. त्यानंतर मुंबई महानगरपालिका आणि सामाजिक संस्थांनी विसर्जनस्थळी स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अनंत चतुर्दशीच्या दिवशी गुरुवार, २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ च्या सुमारास गणेश विसर्जन सोहळ्यास सुरुवात झाली. लालबागमधील गणेशगल्लीतील ‘मुंबईच्या राजा’ची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. त्यापाठोपाठ लालबाग परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती मार्गस्थ होऊ लागल्या. ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेण्यासाठी लालबाग परिसरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. बेन्जो पथक, नाशिक बाजा. ढोल-ताशाच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणुका मार्गस्थ होत होत्या. हळूहळू कुलाबा, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, मुंबई सेंट्र, परळसह उपनगरांमध्येही गणेश विसर्जन मिरवणुका मार्गस्थ होऊ लागल्या आणि विसर्जनस्थळी जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले. परिणामी, या मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. काही बेस्ट बसही पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या होत्या. तसेच गणेश विसर्जनाला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

आणखी वाचा-अमृता फडणवीसांनी जुहू चौपाटीवर राबवली स्वच्छता मोहीम! ट्रॅकसूट, हातमोजे आणि डोळ्यांवर गॉगल लावलेला लुक चर्चेत

गिरगाव, दादर, जुहू यासह सर्व चौपाट्या, तलाव, कृत्रिम तलावांवर दुपारनंतर गणेश विसर्जनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. गिरगाव चौपाटीवर परदेशी पर्यटक, अति महत्त्वाच्या व्यक्तींना विसर्जन सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहता यावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने खास व्यवस्था केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री, नेते मंडळींनी गिरगाव चौपाटीला भेट दिली आणि भाविकांचे स्वागत केले. गिरगाव चौपाटीवर शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत गणेश विसर्जन सुरू होते.

आणखी वाचा-स्किझोफ्रेनियाग्रस्त महिलेचे शंभरहून अधिक वेळा नियंत्रण कक्षाला दूरध्वनी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील चौपाट्या, तलाव आणि कृत्रिम तलावांमध्ये एकूण ३९ हजार ५०२ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सहा हजार ८३७, तर घरगुती ३२ हजार २०३ गणेशमूर्तींचा समावेश होता. तर ४६२ गौरींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले. नैसर्गिक स्रोतांमधील प्रदुषण टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंदाही ठिकठिकाणी कृत्रिम तलाव उभारले होते. या तलावांमध्ये या तलावांमध्ये ११ हजार १०७ गणेशमूर्ती आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले. त्यात १० हजार २०७ घरगुती आणि ७४० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीं, तसेच १६० गौरींचा समावेश होता.