मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून नुकत्याच काढण्यात आलेल्या बृहतसूचीवरील घरांसाठीच्या सोडतीत गैरप्रकार झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. या सोडतीतील अर्जदाराने बनावट कागदपत्रे सादर केल्याचा अहवाल दुरूस्ती मंडळाच्या संबंधित कार्यकारी अभियंत्याकडून (डी-१ विभाग) सादर केला असताना या अहवालाकडे काणाडोळा करत सदर अर्जदाराचा सोडतीत समाविष्ट करण्यात आला आहे. तर हा अर्जदार चार घरांसाठी विजेता ठरला आहे. यावर तक्रारदाराने आक्षेप घेत सोडतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत पात्रता समितीविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची दुरूस्ती मंडळाने दखल घेतली असून संबंधित अर्जदाराच्या घराचे वितरण थांबविण्याचा. तसचे या प्रकरणाच्या चौकशीचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल

कोसळलेल्या वा अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना दुरूस्ती मंडळाच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरीत केले जाते. तर कोसळलेल्या वा अतिधोकादायक इमारतीचा पुनर्विकास झाल्यानंतर या रहिवाशांना हक्काची घरे वितरीत केली जातात. मात्र त्याचवेळी असे काही रहिवाशी आहेत की ज्यांच्या इमारतीचा अनेक कारणाने पुनर्विकास होत नाही आणि त्यांना संक्रमण शिबिरातच रहावे लागते. तेव्हा अशा रहिवाशांना हक्काची घरे देण्यासाठी दुरूस्ती मंडळाकडून रहिवाशांची बृहतसूची तयार केली जाते. मंडळाला पुनर्विकासाद्वारे उपलब्ध झालेली अतिरिक्त घरे या रहिवाशांना वितरीत केली जातात. त्यानुसार मागील आठवड्यात बृहतसूचीवरील पहिली संगणकीय सोडत पार पडली. बृहतसूचीवरील घरांच्या वितरणात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत असल्याने आता ही सोडत संगणकीय करण्यात आली आहे. तर आता या सोडतीतही गैरप्रकार झाल्याचा आरोप करत यासंबंथीची तक्रार ट्रान्झिट कँम्प असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत पेठे यांनी म्हाडा प्राधिकरणाकडे केली आहे.

हेही वाचा : मुंबईत धुक्याचे साम्राज्य

या तक्रारीनुसार उपकर इमारत १८ आणि २४, पेठे बिल्डिंग, अक्कलकोट लेन, गिरगाव येथील सहा घरांसाठी मुळ भाडेकरुचा वारसदार म्हणून एका अर्जदाराकडून सहा अर्ज बृहतसूचीवरील घरांचे वितरण करण्यासंबंधी दुरूस्ती मंडळाकडे दाखल झाले होते. त्यानुसार २०२२ मध्ये कार्यकारी अभियंता डी-१ विभागाने हे अर्ज पात्र ठरविले. मात्र त्यानंतर काही तक्रारी आल्याने या अर्जांची सखोल पडताळणी करण्यात आली आणि या अर्जदाराने बनावट कागदपत्र सादर केल्याचे पडताळणीत सिद्ध झाल्याचा अहवाल २२ ऑगस्ट २०२३ मध्ये सादर करण्यता आला. या अहवालानुसार अर्जदाराने सादर केलेली वीज देयेके, मतदाराचा उतारा माहिती बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे.तर अक्कलकोट इमारतीला दुसरा मजला नसतानाही दुसर्या मजल्यावरील घरासाठी दावा केला होता. एकूणच पडताळणीनुसार संबंधित अर्जदाराने खोटी कागदपत्रे सादर करत कार्यालयाची फसवणूक केल्यामुळे त्याच्याविरोधात वरिष्ठ पातळीवर कायदेशीर कारवाई करावी असे पडताळणी अहवालात नमुद करण्यात आले होते. तसेच पात्रता समितीने पूर्वी (२०२२) अर्जदार पात्र ठरविल्याचा अहवाल रद्द करत सदर अर्जावर कोणतीही कारवाई करू नये असेही अहवालात स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे.

हेही वाचा : तळीयेतील दरडग्रस्त ६६ कुटुंबांना आज पक्क्या घराचा ताबा मिळणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात चावी वाटप

या अहवालानुसार या अर्जदाराविरोधात पुढील कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र असे न करता उलटपक्षी या अर्जदाराचा सोडतीत समावेश केला असून हा अर्जदार ७०१ ते ७५३ चौ.फुटाच्या एकूण चार घरासाठी विजेता ठरला आहे. दुरूस्ती मंडळाच्या या कारभारावर अभिजीत पेठे यांनी प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. या तक्रारीनंतर मंडळाने अर्जदाराचे चारही घरांचे वितरण रोखण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हाडा प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकार्याने दिली आहे. यावषियी दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल असे सांगितले. तर अर्जदाराचे वितरण रोखण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : रत्नागिरीत क्रूझ टर्मिनल, भाईंदर-वसईदरम्यान रो-रो सेवा; महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुरसळ यांची घोषणा

दरम्यान या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर सोडतीतील सर्व विजेत्यांच्या अर्जांची, कागदपत्रांची पुन्हा एकदा पडताळणी करण्याचे आदेश म्हाडा प्राधिकरणाकडून देण्यात आल्याचे समजते आहे. तर महत्त्वाचे म्हणजे सोडत संगणकीय करण्यात आली असली तरी सोडतीनंतरची प्रक्रिया संगणकीय झालेली नाही. त्यामुळे आता सोडतीनंतरची प्रक्रिया ही संगणकीय (आँनलाईन) करण्याची मागणी होत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai a person won mhada home with fake documents mumbai print news css
First published on: 05-01-2024 at 13:17 IST