मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण – कर्जत विभागातील भिवपुरी रोड – कर्जत दरम्यान पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. बुधवार ३० एप्रिलपासून रविवार ४ मेपर्यंत फक्त रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्री २ ते ३.३० पर्यंत दीड तासांचा ब्लॉक असल्याने लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. परिणामी, रविवारपर्यंत रात्रीची शेवटची सीएसएमटी-कर्जत लोकल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही लोकल कर्जतऐवजी बदलापूरपर्यंत धावणार आहे. त्यामुळे नोकरदारांची प्रचंड गैरसोय होणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, विशाखपट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, होसपेटे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, सिकंदराबाद – राजकोट, कोयंम्बत्तूर – राजकोट, सिकंदराबाद ते पोरबंदर, काकिनाडा फोर्ट – भावनगर या रेल्वेगाड्या कर्जत – पनवेल – दिवा मार्गे वळवण्यात येणार आहेत. या रेल्वेगाड्या २०-३० मिनिटे उशिराने पोहोचतील. कल्याण येथे थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांना पनवेल आणि ठाणे येथे थांबा दिला जाईल. या रेल्वेगाड्यांव्यतिरिक्त उशिरा धावणाऱ्या मेल, एक्स्प्रेस, सुट्टी विशेष रेल्वेगाड्या आवश्यकतेनुसार वळवल्या जातील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जतसाठी रात्री १२.१२ वाजता सुटणारी लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येईल. ही लोकल बदलापूर – कर्जतदरम्यान रद्द करण्यात येणार आहे. कर्जत येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रात्री २:३० वाजता सुटणारी लोकल बदलापूर येथून चालवण्यात येईल. ही लोकल कर्जत आणि बदलापूर दरम्यान रद्द करण्यात येणार आहे.