मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पूल आणि सी डी बर्फीवाला पूल यांना जोडणे शक्य नाही. असा कठीण उतार दिल्यास अपघात होण्याची शक्यता असल्याचा महापालिका प्रशासनाला अखेर उलगडा झाला आहे. त्याचाच भाग म्हणून व्हीजेटीआयची मदत घेऊन यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूलाची एक बाजू सुरू झालेली असली तरी हा पूल जुन्या सी डी बर्फीवाला पुलाला कसे जोडायचे याचे मोठे कोडे पालिकेच्या पूल विभागाला पडले आहे. अंधेरी पश्चिम दिशेला असलेल्या सी डी बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांची पातळी नवीन बांधकामामुळे वरखाली झाली आहे, तसेच त्यात अंतर पडले आहे. त्यामुळे, पालिकेच्या कामाबाबत समाजमाध्यमांवरून टीका होऊ लागल्यावर आणि नियोजनाचे हसे होऊ लागल्यावर महापालिकेच्या पूल विभागाने सोमवारी रात्री याबाबत परिपत्रक काढून भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा : ज्येष्ठ नागरिक म्हाडातील विकासकाची नियुक्ती रद्द करु शकतात!

ही पातळी समतल करण्यासाठी व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट दिली आहे. हे दोन पूल जोडण्यासाठी कोणती पद्धत वापरावी याबाबत चर्चाही करण्यात आली असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. गोखले पूलाची सध्या एकच बाजू सुरू झाली असून पुलाची दुसरी बाजू सुरू करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ ची मुदत देण्यात आली आहे. तेव्हाच हे दोन्ही पूल जोडण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या सर्व पुलांची उंची वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे, रेल्वेवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या सर्व उड्डाणपुलांची उंची वाढवण्यात येणार आहे. जुना गोखले पूल हा सुमारे ५.७ मीटर उंचीवर होता, तर आताचा पूल हा ८.४ मीटर उंचीवर आहे. त्यामुळे, उंची २.७ मीटरने वाढली असून हे अंतर पडले असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

हेही वाचा : ईडीद्वारे टाच आणलेल्या मालमत्ता मोकळ्या करण्याचा एनसीएलटीला अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघाताची शक्यता

इंग्रजी वाय अक्षराच्या आकाराचा असलेला बर्फीवाला पूल आणि नवीन गोखले पूल यामध्ये सुमारे दीड मीटर उंचीचे अंतर आहे. हे अंतर हटवण्यासाठी दोन पुलांमध्ये उतार बांधल्यास तो खूपच कठीण उतार असेल व त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. हा उतार तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.