Mumbai Local Alert Updates मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या दीर्घकालीन ब्लॉकमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ असून मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने ब्लॉकची आधी काही दिवस कल्पना देणे आवश्यक होते. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी शेकडो लोकल रद्द होणार असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे, असे सांगून विविध संघटनांकडून ब्लॉकला विरोध करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवर ३१ मे ते २ जूनपर्यंत घेण्यात येणाऱ्या ब्लॉकचा फटका मुंबईसह, ठाणे व कल्याण-डोंबिवली येथील प्रवाशांना बसणार आहे. दरदिवशी लाखोंच्या संख्येने नागरिक लोकलने प्रवास करतात. मात्र, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला आणि मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी आयत्यावेळी माध्यमांना माहिती दिली. ऐनवेळी सरकारी, खासगी कंपन्यांमधील नोकरदारांना त्वरित सुट्टी किंवा घरून काम करण्याची मुभा कशी मिळेल. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने किमान एक आठवडा आधी मेगाब्लाॅकची माहिती देणे अपेक्षित होते, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : आज सीएसएमटी ते दादर, वडाळा लोकल बंद
आताचा ब्लॉक रद्द करून त्याचे पुन्हा नियोजन करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने गुरुवारी सीएसएमटी परिसरात घोषणाबाजी करीत आंदोलन केले. प्रवासी आणि प्रवासी संघटनांना विचारात न घेता मध्य रेल्वेने मनमानी पद्धतीने निर्णय घेतला आहे. या ब्लाॅकचा थेट परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे येथील प्रवाशांवर होणार आहे. मेगाब्लॉक घेण्यापूर्वी किमान सात दिवस अगोदर रेल्वे प्रवाशांना सूचना देण्यात यावी, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी सांगितले. शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी कंपन्यातील नोकरदारांना ब्लॉकच्या दिवशी सुट्टी द्यावी किंवा घरून काम करण्याची परवानगी द्यावी. ब्लाॅक काळातील गर्दीचे नियोजन व्हावे, यासाठी नोकरदार वर्गाच्या कामाच्या वेळा शिथिल कराव्यात, अशा मागण्या शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे.