|| नीलेश अडसूळ, भगवान मंडलिक, प्रसेनजित इंगळे

गतवर्षीच्या तुलनेत मागणीत वाढ; महागाईमुळे ग्राहकांसोबत व्यावसायिकांचाही सावध पवित्रा

मुंबई : दिवाळीच्या फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे जिन्नस महागल्यामुळे फराळ बनवण्याचा खर्च वाढला आहे. याचा परिणाम तयार फराळाची पाकीटबंद विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवरही दिसून येत आहे. करोनाचे संकट कमी झाल्यामुळे बाजारात तयार फराळाची मागणी काहीशी वाढली असली तरी, चढ्या दरांमुळे ग्राहक माफक प्रमाणात मागणी नोंदवत आहेत. दुसरीकडे, ग्राहकांकडून अद्याप पुरेशी मागणी नसल्याने आणि  जिन्नसांच्या महागाईमुळे फराळ निर्मात्या व्यावसायिकांनीही कमी प्रमाणात फराळ तयार केले आहेत.                      

 मुंबई महानगरांतील अनेक महिला बचत गट दिवाळीच्या आधीपासून फराळ निर्मितीच्या कामात व्यग्र होतात. गतवर्षी करोनाचे गडद सावट असल्यामुळे अन्य गोष्टींप्रमाणे तयार फराळालाही अजिबात उठाव नव्हता. परिणामी या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, यंदा आटोक्यात आलेला करोना संसर्ग, शिथिलीकरण     यामुळे ग्राहकांमध्ये निर्माण झालेल्या उत्साहाचा परिणाम तयार फराळाच्या विक्रीतूनही दिसून येईल, अशी विक्रेत्यांना आशा आहे. मात्र, फराळासाठीच्या जिन्नसांतील दरवाढीमुळे तयार फराळांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी हात आखडता घेतला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तयार फराळांच्या दरांत २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

दिवाळी आठवडाभरावर येऊन ठेपली तरी, ग्राहकांकडून फारशी मागणी नाही. ‘तयार फराळाला यंदा प्रतिसाद चांगला मिळत असला तरी दरवर्षी ठरलेल्या ग्राहकांकडून पदार्थांची होणारी मागणी घटली आहे. पूर्वी दोन किलो चकलीची मागणी करणारे ग्राहक आता एका किलोवर समाधान मानत आहेत,’ असे विक्रेत्या संगीता पवार यांनी सांगितले. वसईतील गृहिणी व व्यावसायिक सविता ब्राह्मणे यांनीदेखील आधीच्या वर्षांच्या तुलनेत यंदा मागणी कमीच असल्याचे म्हटले. ‘गतवर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात मागणी आहे. नवरात्रीपासून आमच्याकडे आगाऊ नोंदणी केली जाते. मात्र, यंदा मागणी उशिरा येत असून ग्राहक नेहमीपेक्षा कमी प्रमाणात नोंदणी करत आहेत,’ असे त्या म्हणाल्या.

करोनाकाळानंतरचा व्यवसाय बदलला आहे. नोकरी गेल्याने अनेकजण या व्यवसायात उतरले आहेत. परिणामी स्पर्धा वाढल्याने ग्राहक मिळविण्यासाठी कसब पणाला लावावे लागत आहे. शिवाय स्वच्छतेला महत्त्व आल्याने ग्राहकांचा विश्वास संपादन करावा लागत आहे. महागाईमुळे दरवाढ झाली असली तरी मागणीवर फारसा परिणाम होणार नाही अशी आशा आहे.  -अनिकेत आपटे, दत्तकृपा फुडस

 करोना महासाथीने अनेक महिलांचे रोजगार गेले. बेरोजगार महिलांना संघटित करून घरगुती पद्धतीने दिवाळी फराळातील सर्व पदार्थ तयार केले आहेत. यामधून बेरोजगार महिलांना रोजगार मिळाला. गेल्या वषीच्या तुलनेत यंदा फराळ तसेच इतर पदार्थांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. विशेष म्हणजे घरगुती पद्धतीने तयार केलेल्या पदार्थांना पसंती मिळत आहे. – नीलम चौधरी, प्राची कॅटरर्स, कल्याण</strong>

मागणी वाढण्याची आशा

सध्या मागणी कमी असली तरी, व्यावसायिकांना ग्राहक वाढण्याची आशा आहे. ‘दिवाळीपूर्वी १५ दिवस ते एक महिना अगोदर आमचे कायमस्वरूपी ग्राहक आमच्याकडे फराळातील पदार्थांची नोंदणी करतात. मागणीप्रमाणे ग्राहकांना फराळपुरवठा करतो. गुणवत्तेमुळे नवीन ग्राहक दरवर्षी वाढतात,’ अशी माहिती डोंबिवलीतील सुरुची कॅटरर्सच्या संचालिका भाग्यश्री प्रभुघाटे आणि सुजाता परांजपे यांनी दिली.