मुंबई : महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण वाटचाल सुरू केली आहे. आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊ या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मंत्रालयातील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात केले.

मंत्रालयात भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.

ध्वजारोहण समारंभानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंत्रालयातील प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  ‘‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला ध्वजारोहणाची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य  समजतो. गेल्या अडीच – पावणे तीन वर्षांत करोनाच्या भयंकर विषाणूने आपल्याला बंदिस्त केले होते. आज संकट पूर्णपणे गेलेले नाही, पण या विषाणूने घातलेल्या बेडय़ा आपण सगळय़ांनी तोडल्या आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण उत्साहाने साजरा करत आहोत. तसेच येणारा गणेशोत्सव, दहीहंडी किंवा इतर धार्मिक सणही आपण नेहमीप्रमाणे काळजी घेऊन, पण जल्लोषात साजरे करणार आहोत, असे शिंदे यांनी सांगितले.   

गेल्या दोन महिन्यांत राज्याच्या अनेक भागांत जोरदार पाऊस, अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले. आम्ही तातडीने प्रत्यक्ष अतिवृष्टीग्रस्त भागांना भेटी दिल्या. वेगाने पंचनामे सुरू झाले. २८ जिल्ह्यांना फटका बसला असून १५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असावे, असा अंदाज आहे. सुमारे १५ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले, त्यांची राहण्याची, जेवण्याची व्यवस्था केली. अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून ‘एनडीआरएफ’च्या मदतीपेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सध्या ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येते, ती वाढवून ३ हेक्टर मर्यादेत करण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. पूर, अतिवृष्टी यावर कायमस्वरूपी आणि शाश्वत उपाय करण्यासाठी आम्ही जलसंपदा विभागामार्फत नद्यांचे खोलीकरण, गाळ काढणे यासाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम तयार करीत आहोत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

ओबीसी, मराठा, धनगर समाज यांना आरक्षणाचे फायदे मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. बांठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्याने ओबीसी समाजाला दिलासा मिळाला आहे. ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळाले आहे. सारथी आणि महाज्योती या संस्थांना आम्ही बळकट करीत आहोत. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या विकासासाठी ‘अमृत’या संस्थेला देखील उभारी देण्यात येत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची चांगली अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. ‘आमचे गुरुजी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात वर्गामध्ये शिक्षकांचे छायाचित्र लावण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना शिक्षकांची ओळख होईल. राज्यातील कोणतीच शाळा एक शिक्षकी राहणार नाही, असे नियोजन आम्ही केले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कौशल्य विकासास प्राधान्य

राज्यात उद्योग- रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उद्योगपती रतन टाटा आणि इतरांची भेट घेऊन चर्चा केली आहे. कौशल्य विकासास प्राधान्य देणार असून, त्याद्वारेही रोजगार कसा वाढेल हे आम्ही पाहणार आहोत. आज सकाळीच स्टार्टअप व नाविन्यता यात्रेला हिरवा कंदील दाखवल्याचे शिंदे म्हणाले.  कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन करणे हे सागरी किनाऱ्यालगतच्या पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचे आहे. याशिवाय स्थानिकांना रोजगारही मिळणार आहे. हे लक्षात घेता येत्या वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणण्यासाठी नियोजन करणे सुरू आहे. तसेच प्लॅस्टिकला पूर्णपणे बंदी घातली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

 ‘समृद्धीचा पहिला टप्पा लवकरच

‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ हा विकासाचा महामार्ग ठरेल़  येत्या काही दिवसांत या महामार्गाचा पहिला टप्पा कार्यान्वित होईल, असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. राज्यातील शहरी भागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी पीएम गतीशक्ती प्रारूपाचा वापर करणार आहोत, असेही शिंदे यांनी सांगितल़े

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.