Vadnagar Tea Stall: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयआरसीटीसी) गुजरातमधील वडनगर रेल्वे स्थानकात नवीन आधुनिक फूड प्लाझा सुरू केला आहे. हा फूड प्लाझा चहा या संकल्पनेवर आधारित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बालपणी वडनगर रेल्वे स्थानकात चहा विक्री करीत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या गावी झाला. मोदी कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अतिशय सामान्य होती. उपजीविकेसाठी त्यांचे वडील वडनगर रेल्वे स्थानकावर चहा विकत होते. नरेंद्र मोदी लहानपणी वडिलांना वडनगर रेल्वे स्थानकात चहा विकण्यास मदत करीत होते, असे बोलले जाते. पश्चिम रेल्वेवरील याच वडनगर रेल्वे स्थानकावर आयआरसीटीसीने आधुनिक फूड प्लाझा सुरू केला आहे.

बालपणी वडनगर रेल्वे स्थानकात वडिलांसोबत चहा विकल्याचे लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा सांगितले होते. वडनगर रेल्वे स्थानकात एक छोटी चहाची टपरी आहे. तिथून मोदी यांचा बालपणीचा जीवन प्रवास सुरू झाला. आयआरसीटीसीने मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वडनगर रेल्वे स्थानकात आधुनिक फूड प्लाझा सुरू केला आहे.

रेल्वेमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि आयआरसीटीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा आणि उत्कृष्ट सेवा पुरवण्यासाठी आयआरसीटीसी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहे. ३८३ चौ.मी. क्षेत्रफळावर उभारण्यात आलेल्या या फूड प्लाझामध्ये ५२ आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्लाझाची रचना खास चहा या संकल्पनेवर आधारित आहे. येथे प्रवाशांना आवडता पारंपरिक कटिंग चहा, तसेच जॅस्मिन, अर्ल ग्रे, आणि ग्रीन टी सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रीमियम चहाचे प्रकार चाखता येतील.

वडनगर रेल्वे स्थानकातील फूड प्लाझामध्ये प्रवाशांना जागतिक दर्जाची सेवा मिळेल. चहा या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम प्रवाशांसाठी आगळावेगळा आणि नवीन अनुभव देणार आहे, असे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडचे (आयआरसीटीसी) पश्चिम विभागाचे मुंबईचे समुह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले.