मुंबई : जागेश्वरीतील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यांपासून वेतनच देण्यात आलेले नाही. त्यातच आता सणासुदीचे दिवस असल्याने आर्थिक अडचणीचा सामना करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत वेतन मिळणार नाही, तोपर्यंत काम करणार नाही, असा पवित्रा घेत ट्रॉमा सेंटरमधील जवळपास २०० डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले आहे. यामुळे रुग्णालयातील आरोग्य सुविधेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे निदर्शनास आले आहे.
ट्रॉमा केअरमध्ये २०१३ पासून कार्यरत असलेल्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आजपर्यंत कोणत्याच कंत्राटदाराने किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिलेले नाही. त्यातच १ जानेवारीपासून या कर्मचाऱ्यांचे कंत्राट नवीन कंपनीला देण्यात आले आहे. मात्र तेव्हापासून ही कंत्राटदार कंपनी कर्मचाऱ्यांना विलंबाने वेतन देत आहे. सुरुवातीला जानेवारी – मार्च या तीन महिन्यांचे वेतन थकविले होते. मात्र कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना हे वेतन देण्यात आले. मात्र आता एप्रिलपासून जुलैपर्यंतच्या कामाचे वेतनच या कंत्राटदाराकडून देण्यात आलेले नाही. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराकडे विचारणा केली होती.
मुंबई महानगरपालिकेने जानेवारीपासून देयके मंजूर केली नसल्याने वेतन देण्यात आले नाही, असे त्यांना सांगण्यात आले. यापूर्वी स्वत:च्या खिशातून वेतन दिल्याचे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. मात्र मागील चार महिन्यांपासून वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक अवस्था बिकट झाली होती. त्यातच या महिन्यामध्ये रक्षाबंधन, दहीहंडी, गणेशोत्सव यासारख्या सणासुदीचा काळ आहे.
अनेक कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवासाठी गावी जायचे आहे. मात्र चार महिन्यांपासून वेतनच न मिळाल्याने त्यांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळपासून वेतन मिळत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे रुग्णालयातील आरोग्य सुविधेवर परिणाम झाला आहे. रुग्णालयातील साफसफाई, रुग्णांना जेवण पुरवणे यासारख्या अनेक सुविधांचा खोळंबा झाला आहे.
दरम्यान, यासंदर्भात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हनुमंत वायकुळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मी सध्या बैठकीमध्ये व्यस्त असल्याने यावर बोलू शकत नसल्याचे सांगितले.
कार्यादेशाविनाच कंत्राटदाराला काम
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसंदर्भात जानेवारीमध्ये कंत्राट काढण्यात आले. मात्र त्यामध्ये निवड झालेल्या कंत्राटदाराला कंत्राट न देता राजकीय नेते व अधिकाऱ्यांच्या संगनमताने अन्य कंत्राटदारालाच कंत्राट देण्यात आले. मात्र या कंत्राटदाराला कार्यादेश न देताच काम सुरू करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्याचे देयके काढण्यात न आल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले होते. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यावर कूपर रुग्णालयाचे तत्कालिन अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी चौकशी केली असता त्याला कार्यादेश दिले नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे डॉ. मेढेकर यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर वरिष्ठांनी रुग्णालयातील लिपिकाडून संबंधित प्रकरणाची नस्ती मागवून घेण्यात आली. मात्र त्यानंतर संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी डॉ. मेढेकर यांच्यावरच निलंबनाची कारवाई केल्याची माहिती एका कर्मचाऱ्यांनी दिली.