मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आज कांचनगिरी यांनी कृष्णकुंज येथे राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर याबाबत माहिती दिलीय. तसेच अयोध्येत सर्व साधूसंत राज ठाकरे यांचं मोठं स्वागत करतील असंही नमूद केलं. कांचनगिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे डिसेंबरमध्ये अयोध्येला भेट देण्याचा विचार करत आहेत.

कांचनगिरी म्हणाल्या, “राज ठाकरे डिसेंबरमध्ये अयोध्येला जाण्याचा विचार करत आहेत. जे हिंदुत्वावर प्रेम करतात ते अयोद्धेशी जोडलेले आहेत. आम्ही त्याचं भव्य स्वागत करू. पूर्ण संत समाज त्यांच्यासोबत आहे. राज ठाकरे जे बोलतात ते करतात हे मला खूप आवडलं. देशाला अशाच लोकांची गरज आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील युपी-बिहारच्या लोकांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे. तसेच त्यांनी आता मुंबईत राहताना काळजी करण्याचं कारण नाही. राज ठाकरेंच्या मनात उत्तर भारतीयांविषयी चांगली भावना आहे.”

“राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांवर खूप प्रेम”

“राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांवर खूप प्रेम आहे. त्याचं म्हणणं आहे की बिहारमधील गावांमधून लोकांचं पलायन होतंय. तिथंच कंपन्या सुरू झाल्या तर लोकांना गावातच रोजगार मिळू शकतील. त्यांना घर सोडून जावं लागणार नाही. त्यांच्या याच भूमिकेला लोकांनी चुकीचं घेतलं. ते जितकं प्रेम महाराष्ट्रातील लोकांवर करतात तितकंच प्रेम उत्तर भारतीय लोकांवर करतात,” असंही कांचनगिरी यांनी नमूद केलं.

“भारतात पुढील १० वर्षात अफगाणिस्तानसारखी स्थिती…”

कांचनगिरी म्हणाल्या, “अफगाणिस्तानचे काय हाल झालेत हे सर्वजण पाहत आहेत. पुढील १० वर्षात भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ शकते. हिंदूस्थान त्या धोक्याच्या किनाऱ्यावर आहे. १० वर्षांनंतर हिंदूंना शरणार्थी बनावं लागेल. आज हिंदू जागे झाले नाही तर कधीच जागे होणार नाही.”

संन्यासी लोकांनी राजकारणात यावं का? योगी आदित्यनाथांवर विचारलेल्या प्रश्नावर कांचनगिरी म्हणतात…

कांचनगिरी म्हणाल्या, “जुना इतिहास आहे की संतांनी राज्यांचं नेतृत्व केलंय. चंद्रगुप्त मौर्या यांचं उदाहरण पाहू शकता. त्यांना चाणाक्याने मार्ग दाखवला. त्यानंतर ते यशस्वी राजा बनले. हे संतांचं कामच आहे की राजकीय नेत्यांना मार्गदर्शन करणं.”

“गरज पडल्यास राजकारणात येणार का?”

“माझा राजकारणाशी संबंध नाही. जे खरे राष्ट्रवादी राजकीय नेते आहेत त्यांच्या नेतृत्वात राहू. पण सध्या पदाबाबत कोणताही विचार नाही,” असंही कांचनगिरी यांनी सांगितलं.