मुंबई : कांदिवली (पूर्व) येथे ३७ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबई चे खासदार पियुष गोयल यांनी केली. या क्रीडा संकुलात खेळाडूंना ऑलिम्पिंक २०३६ आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रशिक्षण दिले जाईल, अशीही घोषणा त्यांनी केली.

उत्तर मुंबईच्या सर्व भागात क्रीडा, संस्कृती, ऐक्य आणि सौहार्दाचा उत्सव म्हणून ‘खासदार क्रीडा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. उद्घाटनानंतर या ठिकाणी बुद्धिबळ स्पर्धा पार पडली. ‘मुंबई खासदार क्रीडा महोत्सव २०२५’अंतर्गत आयोजित बुद्धिबळ स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी ३५४ खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. बुद्धिबळ स्पर्धेत ३५४ सहभागींपैकी २९८ खेळाडू अंडर-१६ गटातील असून ५६ खेळाडू ओपन गटातील होते. ही स्पर्धा चारकोप येथील पी. जे. पंचोलिया हायस्कूल येथे पार पडली.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात पीयूष गोयल पुढे म्हणाले की, उत्तर मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा सुविधा उभारण्यास आपण कटीबद्ध आहोत. त्यानुसार कांदिवलीत क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. तसेच प्रमोद महाजन उद्यान आणि बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण यांचाही पुनर्विकास करण्यात येणार असून, त्यामध्ये महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य आणि समावेशक प्रवेश दिला जाईल. त्यामुळे उत्तर मुंबईतील सर्व नागरिकांना व्यावसायिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील.

‘खासदार क्रीडा महोत्सव २०२५’अंतर्गत सर्व मतदारसंघ / वॉर्ड स्तरावर २० हून अधिक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यात दहीहंडी, मॅरेथॉन, वॉकथॉन, साडीथॉन आणि ज्येष्ठ नागरिकांच्या क्रिकेट लीगसारख्या पारंपरिक, तसेच नवीन खेळांचा समावेश आहे. या महोत्सवात सुमारे एक लाखाहून अधिक नागरिक सहभागी होतील, अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली.