मुंबई : स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६ मार्गिकेतील कारशेडचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. मेट्रो ६ च्या कारशेडसाठी कांजूरमध्ये १५ हेक्टर जागा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो ६ मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरू असून, ती २०२५ मध्ये सेवेत दाखल करण्याचे ‘एमएमआरडीए’चे नियोजन आहे. मात्र, मार्गिकेतील कारशेडचा प्रश्न गंभीर बनला. ‘एमएमआरडीए’ने या मार्गिकेची कारशेड कांजूरमार्गच्या जागेवर प्रस्तावित केली होती. महाविकास आघाडी सरकारने आपल्या काळात मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील कारशेड याच जागेवर हलविण्याचा निर्णय घेतला होता. जागेच्या मालकी हक्कावरून सुरू झालेला वाद न्यायालयात गेला. मेट्रो ३ ची कारशेड आरेमधून कांजूरला नेण्यास भाजपने विरोध केला. त्यामुळेच शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर कारशेड कांजूरमधून पुन्हा आरेत हलविली. या वादात मेट्रो कारशेड अडकली. आता मेट्रो ६ चे काम वेगाने होत असल्याने कारशेडचा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक होते. त्यानुसार ‘एमएमआरडीए’ने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यास अखेर यश आले आहे. त्यानुसार राज्य सरकारने ही जागा मेट्रो ६ च्या कारशेडसाठी देण्यास संमती दिली आहे. ही जागा ‘एमएमआरडीए’ला देण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याचे लेखी आदेश सरकारने दिल्याची माहिती ‘एमएमआरडीए’तील सूत्रांनी दिली. ही जागा ‘एमएमआरडीए’ला देण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करावा, असे आदेश मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मार्गिका अशी..
मेट्रो ६ ची मार्गिका पूर्व आणि पश्चिम उपनगरांना थेट जोडणार असून, जोगेश्वरी ते विक्रोळी अंतर कमी होणार आहे. १५.३१ किमी लांबीच्या या मार्गिकेत १३ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. त्यासाठी अंदाजे ६६७२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.