|| संदीप आचार्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : करोना तसेच आर्थिक अडचणींवर मात करत आरोग्य विभागातर्फे वेगवेगळय़ा नव्या योजना व उपक्रम राबविण्याचे काम सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील निवडक जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयात आता खुबे (हिप) व गुडघे बदल शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. करोनाचा सामना करत असतानाच मागील दोन महिन्यांपासून आरोग्य विभागाच्या रुग्णालयात या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्या असून यातील बहुतेक सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यामातून मोफत करण्यात येत आहे.

राज्यातील अनेक ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांना गुडघेबदल तसेच खुबा बदलाच्या शस्त्रक्रियांची आवश्यकता असून खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियांसाठी येणारा खर्च काही लाखांमधील असल्यामुळे गोरगरीब रुग्णांना हे उपचार परवडणारे नसतात. प्रामुख्याने मुंबईतील महापालिकेच्या सर्व रुग्णालयात तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. तथापि ग्रामीण भागातील रुग्णांचा विचार करून आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी या खुबा व गुडघे बदलाच्या शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्याचा निर्णय घेतला.

करोनापूर्व काळातच ही सुरुवात झाली होती. तथापि करोनामुळे सर्व जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांचे करोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आल्यामुळे या शस्त्रक्रिया करण्याचे थांबविण्यात आले होते. तथापि गेल्या दोन महिन्यांपासून हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय तसेच गडचिरोली, भंडारा, औरंगाबाद,सिंधुदुर्ग तसेच पुणे जिल्हा रुग्णालयात या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे.

 याबाबत अतिरिक्त मुख्य सचिव म्हणाले, ‘‘आतापर्यंत खुबा व गुडघे बदलाच्या एकूण ९३० शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सहा कोटी नऊ लाख तीस हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. यात खुबा बदलाच्या ६७८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यापोटी पाच कोटी ३८ लाख तीन हजार पाचशे रुपये तर २४३ गुडघे बदल शस्त्रक्रियांपोटी एक कोटी ४४ लाख ९५ हजार रुपये खर्च आला आहे.’’ गरजू रुग्णांवरील या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत असल्याने मोठय़ा प्रमाणात या शस्त्रक्रियांसाठी नोंदणी करण्यासाठी रुग्ण येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आगामी वर्षांत ग्रामीण भागातील रुग्णांच्या हिप व गुडघे बदलाच्या शस्त्रक्रियांना प्राधान्य देऊन जास्तीत जास्त शस्त्रक्रिया केल्या जातील, असे डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Knee replacement surgery at district hospital akp
First published on: 23-02-2022 at 00:20 IST