मुंबई : सुमारे १,२४३ कोटी रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपाप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी लीलावती रुग्णालयाचे माजी विश्वस्त चेतन मेहता यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रुग्णालयाच्या सध्याच्या विश्वस्तांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी संगनमत करून अशाच प्रकारच्या आरोपांच्या आधारे अनेक गुन्हे दाखल केल्याचा आरोप देखील चेतन मेहता यांनी याचिकेत केला आहे.

लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टचे कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत मेहता यांनी केलेल्या न्यायवैद्यक लेखापरीक्षणानंतर चेतन मेहता यांच्यावर वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. न्यायवैद्यक लेखापरीक्षणात आर्थिक अनियमिततेचे अनेक प्रकार उघड झाल्याचा दावा करण्यात आला होता. चेतन मेहता यांनी केलेल्या याचिकेनुसार, प्रशांत मेहता यांच्या तक्रारीच्या आधारे वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.

त्यामुळे, प्रशांत मेहता यांनी दंडाधिकारी न्यायालयात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे दंडाघिकाऱ्यांनी पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. आरोपांच्या चौकशीनंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) प्रकरण वर्ग करण्यात आले.

तथापि, प्रकरणाच्या चौकशीची आवश्यकता आहे की नाही याबद्दल पोलीस अहवालाची वाट न पाहता दंडाधिकाऱ्यांनी घाईघाईने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला, असा दावा चेतन मेहता यांनी तो रद्द करताना केला. चेतन मेहता यांनी याचिकेत प्रशांत मेहता आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध आरोप केले आहेत. आपण विश्वस्तपद असताना लीलावती रुग्णालय जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा संस्थेत विकसित झाले. रुग्णालयाच्या मुदत ठेवी २०० कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आणि महत्त्वपूर्ण धर्मादाय कामे देखील करण्यात आली आहेत.

परंतु, प्रशांत मेहता यांनी केलेल्या आरोपांमुळे आणि त्यांच्या तक्रारीच्या आधारे आपल्याविरोधात दाखल गुन्ह्यामुळे आपल्याला अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे, आपल्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली असून त्याचा व्यावसायिक विश्वासार्हतेवर परिणाम झाला आहे, असा दावा चेतन मेहता यांनी गुन्हा रद्द करण्याची मागणी करताना केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायवैद्यक लेखापरीक्षणात अतिरिक्त उत्पन्न आणि तोटा झाला नसल्याचे दिसून येत असतानाही आपल्याविरोधात कार्यवाही सुरू ठेवणे हे कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर आहे. या कारवाईमुळे आपले कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे, असेही चेतन मेहता यांनी याचिकेत म्हटले आहे. तसेच, ईओडब्ल्यूने दाखल केलेल्या गुन्ह्याव्यतिरिक्त अन्य गुन्हे रद्द करण्याची मागणीही चेतन मेहता यांनी केली आहे. चेतन मेहता हे बेल्जियमचे नागरिक आहेत. ते २००७ ते डिसेंबर २०२३ पर्यंत लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त होते. त्यानंतर, त्यांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या आदेशाने विश्वस्त पदावरून हटवण्यात आले होते.