मुंबई : धावत्या लोकलमध्ये मध्यरात्री १ च्या सुमारास गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिला पश्चिम रेल्वेच्या राम मंदिर स्थानकावर उतरवून एका सहप्रवाशी अभियंत्याने महिला डाॅक्टरशी दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टरबरोबर संवाद साधून तिची प्रसूती केली.
राम मंदिर रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या या बाळाची प्रकृती नाजूक असून, हृदयामध्ये छिद्र असल्याने या बाळाची प्रकृती गंभीर आहे. कूपर रुग्णालयातील डॉक्टर त्याच्यावर २४ तास लक्ष ठेवून आहेत.
राम मंदिर रेल्वे स्थानकामध्ये प्रसूती झालेल्या महिलेला व तिच्या बाळाला तातडीने कूपर रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयामध्ये उपचारानंतर आईची प्रकृती सुधारत असून, बाळाची प्रकृती अजूनही गंभीर आहे. बाळावर नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. बाळाच्या हृदयामध्ये छिद्र असून, त्याच्या चेहऱ्यामध्ये काही व्यंग आहे.
बाळाच्या विविध तपासण्या करण्यात येत असून, डॉक्टरांनी नवजात बाळाच्या आरोग्य तपसाणीसाठी शुक्रवारी दुपारी रक्ताचे नमूने घेतले असून, त्याचा अहवाल येण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. बाळाची प्रकृती अद्यापही चिंताजनक असली तरी तो कोणत्याही बाह्य उपकरणांच्या मदतीशिवाय श्वासोच्छवास करत आहे, ही जमेची बाजू आहे. त्यामुळे बाळावर उपचार करताना फारच सावधगिरी बाळगण्यात येत असून, त्याच दृष्टीकोनातून उपचारांची दिशा ठरवण्यात येत असल्याचे नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये बाळावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
बाळाची सोनोग्राफी व काही तपासण्या करून उपचारासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच पुढील काही आठवड्यांमध्ये बाळावर हृदय शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात येईल. बाळाला संसर्ग होण्याची शक्यता असल्याने नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. बाळाच्या आईलाही आतमध्ये पाठवले जात नाही. त्यामुळे बाळाला आईचे दूध एका खास डब्यातून दिले जात आहे.
बाळाची आईची प्रकृती सुधारत आहे. असामान्य परिस्थितीमध्येही बाळाचा सुरक्षित जन्म झाल्याबद्दल आनंद वाटत आहे. पण बाळाच्या जन्मानंतर त्याला उचलू घेता येत नसून, त्याला नवजात शिशु अतिदक्षता विभागाबाहेरून पाहताना मनाला फारच त्रास होत आहे. बाळ व आई दोघेही सुखरूप घरी परत यावेत, अशी इच्छा बाळाच्या वडिलांनी व्यक्त केली.