मुंबई : ‘तालवाद्ये माझ्याशी बोलतात. वरवर निर्जीव वाटणाऱ्या या वस्तूंमधील चैतन्य मला जाणवते, त्यांच्यातील बोल लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत, या एका अनावर ओढीने मी त्या वाद्यांवर प्रेमाने, विश्वासाने थाप देतो आणि ती वाद्ये बोलू लागतात’ अशा शब्दांत तालवाद्यांशी जोडल्या गेलेल्या आपल्या गहिऱ्या नात्याचे वर्णन करणारे, तालवाद्यातून अनोखे नादब्रह्म निर्माण करणारे प्रसिद्ध तालवादक तौफिक कुरेशी यांच्याशी संवाद साधण्याचा योग ‘लोकसत्ता गप्पां’च्या माध्यमातून जुळून आला आहे.
कलात्मक अभिव्यक्तीच्या सर्जक क्षेत्रांत नावारुपाला आलेल्या प्रतिभावंतांच्या परिचयाच्या चेहऱ्यापलिकडे त्यांच्या अंतरंगात डोकावण्याची, त्यांच्यातील विविधांगी पैलूंना बहर आणण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास समजून घेण्याची संधी ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमातून मिळते. ‘लोकसत्ता गप्पा’चे नवे पर्व तालवाद्याचे बादशाह म्हणून नावाजलेल्या तौफिक कुरेशी यांच्या भेटीने रंगणार आहे.
प्रसिध्द तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांचे पुत्र आणि झाकीर हुसैन यांचे धाकटे बंधू तौफिक कुरेशी यांच्यावर लहानपणापासूनच नकळत तालाचे संस्कार घडले. मात्र, अब्बाजी आणि थोरले बंधू झाकीर यांच्याप्रमाणे पारंपरिक तबलावादन करण्याबरोबरच विविध प्रकारची तालवाद्यो त्यांना खुणावत होती.
तबला, ढोलक, पखवाज यांसारख्या पारंपरिक भारतीय वाद्यांव्यतिरिक्त जेम्बे आणि बोंगो यांसारख्या परदेशी वाद्यांवरही प्रभुत्व मिळवणाऱ्या तौफिक कुरेशी यांनी कोणाकडेही ही तालवाद्ये वाजवण्याचे शिक्षण घेतले नव्हते. ही वाद्ये ते स्वत:च वाजवायला शिकले.
आफ्रिकन झेंबे असो वा ड्रम या विविध तालवाद्यांवर भारतीय शास्त्रोक्त ताल वाजवण्याचे प्रयोग त्यांनी रुढ केले. चित्रपट संगीतातही तालवाद्यांचा वापर करण्यात ते रंगून गेले. जगप्रसिध्द अशा दोन दिग्गज कलावंतांचे मार्गदर्शन, त्यांचे प्रेम, पाठिंबा असतानाही शास्त्रीय तालवादनात स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या तौफिक कुरेशी यांचा प्रवास तितका सहजसोपा नाही. आजवरच्या त्यांच्या या तालप्रवासातील चढ-उतार, कडू-गोड अनुभव आणि त्यातून घडत गेलेला त्यांच्यातील कलावंत समजून घेण्याची संधी लवकरच ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमातून मिळणार आहे.