मुंबई : ‘माझी बांधिलकी डाव्या विचारसरणीशी होती. तेथील मतांचे ध्रुवीकरण हळूहळू लक्षात आल्यानंतर मी डाव्या पक्षापासून दूर गेलो. नंतर काँग्रेस, भाजप अशा सगळय़ाच पक्षांचे पाणी चाखले, तेव्हा लक्षात आले सगळे खारटच आहेत’ असे परखड मत प्रसिद्ध अभिनेते पीयूष मिश्रा यांनी ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमात व्यक्त केले.
हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता, लेखक, गीतकार, गायक अशी बहुपेडी कामगिरी करणाऱ्या मिश्रा यांच्याबरोबर रविवारी, वरळीतील नेहरू सेंटर येथे गप्पांचा कार्यक्रम रंगला. उर्दू शायरी, कवितेची जाण असलेला प्रसिद्ध अभिनेता ओम भूतकर याने त्यांच्याशी संवाद साधला. नवीन वर्षांत ‘लोकसत्ता गप्पा’ या उपक्रमाच्या पहिल्याच सत्राची सुरूवात अतिशय रोखठोक स्वभाव आणि परखड मते व्यक्त करणाऱ्या पीयूष मिश्रा यांच्यासारख्या मनस्वी कलाकाराच्या उपस्थितीने व्हावी असे वाटत होते. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी उर्दूवर प्रभुत्व असलेला आणि कवितेची जाण असलेला अभिनेता ओम भूतकर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला हा अतिशय चांगला योग आहे, असे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी आभार मानले. ‘केसरी टूर्स’चे शैलेश पाटील यांनी मिश्रा यांचे स्वागत केले. तर एम. के. घारे ज्वेलर्सच्या उदय घारे यांनी ओम भूतकरचे स्वागत केले. गप्पांच्या या कार्यक्रमाचे निवेदन कुणाल रेगे यांनी केले.
मिश्रा यांनी शाळकरी वयात केलेली कविता ते गीतकार म्हणून नावारुपाला आल्यानंतरचा प्रवास अशा वेगवेगळय़ा टप्प्यांवर आलेल्या अनुभवांचा, विचारांचा त्यांच्या कवितेवर कसा प्रभाव पडत गेला या विषयावरून गप्पांचा ओघ सुरू झाला. त्यानंतर वैयक्तिक बदलांबरोबरच राजकीय विचारधारा कशी बदलत गेली, हेही त्यांनी मनमोकळेपणाने सांगितले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काम करण्याची पध्दत मला व्यक्तिश: आवडते. ते नसते तर मी भाजपला मतदानही केले नसते. मोदी यांचा दृष्टिकोन मला आवडतो. त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात येते. मात्र मला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. तुम्ही राजकारणासाठी बनलेले नाहीत, असे राहुल गांधी यांना संबोधताना त्यांना ‘बेटा’ म्हणावेसे वाटते. ते छोटा भीम वाटतात’, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
कलाकार म्हणून दिल्ली ते मुंबईपर्यंतचा झालेला प्रवास, ‘गुलाल’ चित्रपटामुळे रातोरात मिळालेली प्रसिध्दी आणि पुढच्या काही महिन्यांत आलेला अर्धागवायूचा झटका यामुळे आयुष्य कसे बदलले, याविषयी सविस्तर बोलताना विपश्यनेचा मार्ग सापडल्यानंतर आपल्यात व्यक्ती म्हणून कसे बदल झाले आणि त्याचा सकारात्मक परिणाम कलेवरही कसा झाला याचीही माहिती त्यांनी दिली. सामाजिक-राजकीय मुद्यांवर व्यक्त होताना स्वत:बद्दलही तितक्याच तटस्थपणे त्यांनी मांडणी केली. मी ‘स्टार’ नाही. निर्माते ज्यांच्यावर पैसा लावतात तो ‘स्टार’. तसा मी नाही, पण मी रॉकस्टार नक्कीच आहे, असे ठामपणे सांगणाऱ्या पीयूष मिश्रा यांच्या व्यक्तित्वातील काही रंजक पैलू या गप्पांमधून समोर आले.
हेही वाचा >>>पर्यटकांच्या सेवेसाठी माथेरानला ‘पॉड हॉटेल’ उभे राहणार
नाटकाचा‘धडा’ आवश्यक
’‘नाटक ही जिवंत कला आहे, त्यात प्रत्यक्ष सादरीकरण केले जाते. दिवसभरात नाटकाचे चार प्रयोग असतील तर प्रत्येक प्रयोगाला येणारा प्रेक्षक वेगळी विचारधारा घेऊन येतो.
’त्यांच्यासमोर सादर होणारा प्रत्येक प्रयोग वेगळा असतो. नाटक खूप काही शिकवून जाते. शिस्त, वक्तशीरपणा, मैत्री, बंधुत्व या गोष्टी नाटकाने मला शिकवल्या.
’इस्रायलमध्ये लहान मुलांना जसे सैनिकी शिक्षण सक्तीचे असते, त्याच धर्तीवर आपल्याकडे नाटक हा किमान दोन वर्षे शालेय शिक्षणातील अभ्यासाचा भाग असायला हवा’ असे आग्रही प्रतिपादन मिश्रा यांनी केले.
हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता, लेखक, गीतकार, गायक अशी बहुपेडी कामगिरी करणाऱ्या मिश्रा यांच्याबरोबर रविवारी, वरळीतील नेहरू सेंटर येथे गप्पांचा कार्यक्रम रंगला. उर्दू शायरी, कवितेची जाण असलेला प्रसिध्द अभिनेता ओम भूतकर याने त्यांच्याशी संवाद साधला.
(‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात ज्येष्ठ कलाकार पीयूष मिश्रा यांच्याशी अभिनेता ओम भूतकर याने संवाद साधला.)