मुंबई : स्वातंत्र्य दिन, जन्माष्टमी आणि रविवार अशा सलग सुट्ट्यांमुळे, बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गोव्याला जाणाऱ्या नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी पूर्ण झाल्याने, प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. या रेल्वेगाडीचे तिकीट आरक्षण १२ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे.

मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष रेल्वेगाडी गाडी क्रमांक ०१५०२ मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १७ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता मडगाव जंक्शनवरून निघेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१५०१ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

या रेल्वेगाडीला थांबे कुठे असणार.

या रेल्वेगाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी या रेल्वे स्थानकात थांबा असेल.

या रेल्वेगाडीची संरचना कशी असेल.

या रेल्वेगाडीला एकूण २० एलएचबी डबे असतील. एक द्वितीय वातानुकूलित डबा, तीन तृतीय वातानुकूलित डबे, दोन तृतीय वातानुकूलित इकाॅनाॅमी डबे, शयनयान आठ डबे, सामान्य डबे ४, एसएलआर एक डबा, जनरेटर कार एक डबा अशी संरचना असेल.

आरक्षण कधी ?

या रेल्वेगाडीचे आरक्षण १२ ऑगस्ट रोजी सुरू होणार या रेल्वेगाडीचे आरक्षण १२ ऑगस्ट रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस), इंटरनेट आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल.

विशेष गाड्या

मध्य, कोकण रेल्वेवरून ३०२ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने सुरुवातीला २५० गणपती विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली. त्यानंतर, त्याव्यतिरिक्त मध्य रेल्वे ५० विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचे पुन्हा घोषित केले. तसेच दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष रेल्वेगाडीचा विस्तार आणखी दोन सेवा वाढवून केला जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त चालविण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांची संख्या ३०२ वर पोहचली आहे.