लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई: ई वॉलेटमधील २०० रुपये मिळवण्याच्या प्रयत्नात अंधेरीतील महिलेने साडेसहा लाख रुपये गमावल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीने ग्राहक सेवा म्हणून स्वतःचा क्रमांक इंटरनेटवर अपलोड केला होता. त्यातवर महिलेने संपर्क साधला असता आरोपींनी मोबाईल स्क्रीन शेअरिंग अॅप डाऊनलोड करायला सांगून महिलेच्या खात्यातील रक्कम हस्तांतरीत केली.

तक्रारदार महिला एका ट्रॅव्हल एजन्सीत अर्धवेळ काम करते. तिच्या पोलिस तक्रारीनुसार, तिला एका ग्राहकाकडून ई वॉलेटवर २०० रुपये मिळणार होते. ती रक्कम तांत्रिक प्रक्रियेत अडकल्यामुळे ई वॉलेटमध्ये जमा झाली नाही. त्यामुळे या महिलेने ईवॉलेट कंपनीच्या ग्राहक सेवा यंत्रणेचा क्रमांक इंटरनेटवर शोधला व त्याद्वारे त्यांच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला. स्वतःला ईवॉलेट कंपनीचा प्रतिनिधी म्हणवणाऱ्या व्यक्तीने तिला मदत करण्यासाठी रस्क डेस्क रिमोट डेक्सटॉप हे मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. आरोपीने महिलेला बोलण्यात गुंतवून अॅपसाठी विविध संमती देण्यास भाग पाडले. त्यामुळे आरोपीला तिच्या मोबाइल स्क्रीनवर प्रवेश करण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर आरोपीने तिला रक्कम पाठवण्यास प्रवृत्त केले. त्यावेळी ती रक्कम पुन्हा महिलेच्या खात्यात जमा होईल असे सांगितले.

आणखी वाचा-मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे मूल्यांकन अंतिम टप्प्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलेने आरोपीच्या म्हणण्याप्रमाणे केले. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या खात्यातून एकूण सहा लाख ४२ हजार रुपये हस्तांतरीत झाले. त्यानंतर रक्कम पुन्हा महिलेच्या खात्यात जमा झाली नाही. त्यावेळी तिला आपली फसणूक झाल्याचे समजले. तिने संबंधीत क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो क्रमांक बंद आढळला. अखेर महिलेने अंधेरी पोलिस ठाणे गाठून सायबर फसवणुकीची तक्रार दाखल केली.