लोअर परळ रेल्वे स्थानकाबाहेरील डिलायल रोड उड्डाणपुलावर दुसरा गर्डर बसवण्याचे महत्वाचे काम पश्चिम रेल्वेकडून पूर्ण करण्यात आले आहे. पुलावरील किरकोळ कामे आणि पुलाच्या दोन्ही बाजूचे मुंबई महानगरपालिकेकडून काम पूर्ण केल्यानंतर हा पूल नवीन वर्षातच सेवेत येणार आहे.
लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक असल्याच्या कारणास्तव २४ जुलै २०१८ पासून दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला. पादचाऱ्याना पूल नसल्याने करी रोडवरुन वरळी नाका व त्यापुढे जाण्यासाठी थेट मार्ग नाही. त्यामुळे अनेक जण वरळी नाक्यापर्यंत चालतच जातात. तर वाहन चालकांना भायखळामार्गे जाऊन पूर्ण वळसा मारावा लागतो. त्यात प्रचंड हाल होत आहेत. गणपतराव कदम मार्ग, आर्थर रोड जेल मार्ग, वरळी नाका, सेनापती बापट मार्ग याशिवाय करी रोड, लोअर परळ परिसरातील रस्त्यांवरुन जाणाऱ्या वाहन चालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्यामुळे पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा >>> मुंबईत आजही पावसाची शक्यता ; पश्चिम उपनगरात रात्रभर पाऊस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम रेल्वे आणि मुंबई महानगर पालिकेने रेल्वे हद्दीवरील या पुलाचा भाग तोडण्याचे काम टप्प्याटप्याने फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरु केले. हे काम पूर्ण होताच पुलावर नव्याने पहिला गर्डर बसविण्याच्या कामाला विलंब झाला आणि जून २०२२ मध्ये हे काम पूर्ण करण्यात आले. १,०४५ टन वजनाचा आणि ९० मिटर लांबीचा गर्डर बसविण्यात आला. दुसरा गर्डर बसविण्याचा कामाला पाच दिवसांपूर्वी रात्री ब्लॉक घेऊन सुरुवात करण्यात आली. हे काम रविवारी पूर्ण झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. आता पुलावर काही किरकोळ कामे बाकी आहेत. मुंबई महानगरपालिकेने पुलाच्या पूर्वेकडील कामांना सुरुवात केली असून पश्चिमेकडील काम बाकी आहे. हा पूल नवीन वर्षात सेवेत येईल. रेल्वे हद्दीतील या कामाचा खर्च सुमारे १२५ कोटी रुपये आहे.लोअर परेल उड्डाणपुलावर दुसरा गर्डर बसविण्यासाठी गेले पाच दिवस ब्लॉक घेऊन केल्या जाणाऱ्या कामात पश्चिम रेल्वेचे १५ अभियंते, १०२ रेल्वे कामगार कार्यरत होते.