मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपतर्फे देशभरात बुधवारपासून महिनाभर महा जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून या द्वारे ८० कोटी नागरिकांपर्यंत सरकारची कामगिरी पोचविली जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या अभियानात केंद्रीय मंत्री, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी असे २२७ प्रमुख नेते लोकसभेच्या सर्व मतदारसंघात प्रवास करणार असल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी प्रदेश कार्यालयात मंगळवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजमेरमध्ये बुधवारी होणाऱ्या सभेने अभियानाला प्रारंभ होणार आहे. ३१ मे ते ३० जून या काळात होणाऱ्या या महा जनसंपर्क अभियानात मोदी सरकारच्या विविध योजनातील लाभार्थीचे संमेलन, प्रबुद्ध संमेलन, जनसंघापासून काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असे अनेक कार्यक्रम होणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदार संघात समाजातील मान्यवर, प्रभावशाली व्यक्ती , पद्म पुरस्कार, खेल पुरस्कार व अन्य महत्वाचे पुरस्कार प्राप्त व्यक्ती अशा सुमारे साडेपाच लाख मान्यवरांना ‘संपर्क ते समर्थन’ या कार्यक्रमाअंतर्गत व्यक्तिगत भेटून त्यांच्यापर्यंत मोदी सरकारची कामगिरी पोचविली जाणार आहे. विचारवंतांबरोबर त्या लोकसभा मतदारसंघात प्रवास करणारे राष्ट्रीय नेते, केंद्रीय मंत्री हे गेल्या ९ वर्षांतील देशाच्या प्रगतीबाबत विचारमंथन करतील. तसेच जनसंघापासून भाजपमध्ये काम करणारे वरिष्ठ कार्यकर्ते ,भाजप विचाराला समर्थन देणारे अन्य संस्थांचे कार्यकर्ते यांच्याशीही केंद्रीय मंत्री,राष्ट्रीय नेते संवाद साधतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभियानाच्या शेवटच्या १० दिवसात प्रत्येक मतदारसंघात मोदी सरकारच्या ९ वर्षांतील कामगिरीची पुस्तिका घरोघरी पाठविली जाणार आहे. या महा जनसंपर्क अभियानादरम्यान मोदी यांच्या देशभरात १२ सभांचे आयोजन करण्यात येणार असून नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, स्मृती इराणी व अन्य नेत्यांच्या सभाही होणार आहेत.जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या ‘बलिदान दिनी’ म्हणजे २३ जून रोजी मोदी देशभरातील १० लाख मतदान केंद्रांवर (बूथ) ऑनलाईन सभेने संबोधित करतील. देशातील जनतेने या अभियानाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन तावडे यांनी केले.