मुंबई : गृहविभागाने राज्यातील पोलिसांच्या बदल्या केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान मुंबई बाहेर बदली झालेल्या बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांना आता परत बोलावण्यात आले. त्यापैकी बहुतेकांना त्यांच्या जुन्या पदांवर बदली करण्यात आली आहे.

मंगळवारी राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. त्या आधीच गृहविभागाने राज्यातील चार सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या. मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप किसनराव भागवत यांची मुंबईहून सांगलीमध्ये बदली करण्यात आली आहे. तर ठाण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये बदली करण्यात आली आहे. नागपूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक शेळके यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शालिनी शर्मा पुन्हा मुंबईत

निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तातडीने या बदल्या करण्यात आल्या. नागपूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्त शालिनी शर्मा यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र पोलिसांमध्ये झालेल्या मोठ्या फेरबदलादरम्यान शर्मा यांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली होती. शालिनी शर्मा बराच काळ मुंबई पोलिसांच्या इंटरपोल युनिटशी संबंधित होत्या.

विविध पोलीस आयुक्तालयात अंतर्गत फेरबदल

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पोलीस आयुक्तालयात अंतर्गत फेरबदल करण्यात आले आहे. ठाण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा नितीन पवार यांची विशेष शाखा-१ मधून ठाण्यातील आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. वर्तकनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांची विशेष शाखेत, तर कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांची वर्तक नगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. मिरा भाईंदर, वसई, विरार पोलीस आयुक्तालयातील काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड यांची परवाना शाखेत आणि परवाना शाखेत असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांची काशिगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मांडवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांची नायगावमध्ये, तर रणजीत आंधले यांची मांडवी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली होती.