मुंबई : राज्यात सर्वदूर तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. गेले अनेक दिवस थंडीचा कडाका कायम असून मंगळवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. धुळे येथे ६.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद मंगळवारी झाली. सांताक्रूझ कोकणातील अलिबाग, रत्नागिरी, डहाणू भागातही थंडी वाढली आहे.
राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढले आहेत. त्यामुळे कोरड्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होताना दिसून येत आहे. परिणामी राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. विशेषत° मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमानात घसरण होणार असून थंडी वाढणार आहे. दरम्यान, राज्यातील जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड , हिंगोली या जिल्ह्यात मंगळवारी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
अनेक जिल्ह्यांमधील कमाल आणि किमान तापामानात वेगाने घट होत आहे. उन्हाळ्यात प्रचंड तापणाऱ्या विदर्भात देखील किमान तापमान यवतमाळ येथे ९.६ अंश सेल्सिअस तर, गोंदिया येथे १० अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. गेल्या दोन दिवसांत राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद धुळे तसेच जेऊर येथे ८ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे.
नोव्हेंबरचा दुसरा आणि तिसरा आठवडा चांगलाच गारठवणारा ठरला. त्यामुळे ग्रामीण भागातच नाही तर शहरातही रात्रीच्या वेळी रस्त्यांवर ठिकठिकाणी मजूर, कष्टकरी थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत. आतापर्यंत रात्री ते पहाटेपर्यंत जाणवणारी थंडी आता दिवसाही जाणवत आहे.
राज्यात पुढील दोन दिवस थंडीची तीव्रता अधिक जाणवणार आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्यांनी थंडीपासून वाचण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. राज्यात नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपल्यानंतर अचानक थंडीत वाढ झाली. उत्तरेकडून येणार््या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर वाढला असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
सांताक्रूझ येथे १८.९ अंश सेल्सिअस
गेले काही दिवस हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात १७ ते १८ अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली आहे. सांताक्रूझ येथे सोमवारी १८.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. जे सरासरीपेक्षा २.३ अंशानी कमी होते.
