मुंबई : उच्चशिक्षित तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून त्यांना ‘सायबर गुलाम’ बनवले जात असल्याचे प्रकार वाढू लागले आहे. महाराष्ट्र सायबर शाखेसह विविध शहरातील पोलीस या टोळीचा शोध घेत आहे. याप्रकरणी एका दलालाला मिरा रोडमधून अटक करण्यात आली आहे.

या टोळीच्या जाळ्यात दोन तरूण अडकले होते. त्यापैकी एक तरूण गुजरातमधील, तर दुसरा मिरा रोडमधील होता. समीर शेख, आमीर खान, सागर मोहीत उर्फ ॲलेक्स या त्रिकुटाने या दोन तरूणांना परदेशातील ऑनलाईन कॉल सेंटरमध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर त्यांना थायलंड मार्गे लाओसमध्ये बेकायदेशीररित्या पाठवले होते.

लाओसमध्ये पोहोचल्यावर या दोन्ही तरूणांना एका सायबर फसवणूक करणाऱ्या कंपनीमध्ये पाठविण्यात आले. तेथे एका चिनी नागरिकाने काम करण्यास भाग पाडले. भारतीय मुलींच्या नावाने फेसबुक खाती तयार करण्यात आली. त्यांना परदेशातील भारतीयांच्या फेसबुक खात्यांची माहिती देण्यात आली. त्या लोकांना जाळ्यात ओढून गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले. नकार दिल्यानंतर मारहाण करण्यात येत होती. त्यामुळे हे दोन्ही तरूण सायबर गुलाम म्हणून काम करत होते.

टोळीतील एका आरोपीला अटक

याबाबत काशिमिरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तपास करून आमीर सोहेल नईम अहमद या दलालाला नया नगर येथून अटक केली. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. मागील वर्षी महाराष्ट्र सायबर कक्षाने लाओसमधून ४७ भारतीयांची सुटका केली होती. नंतर सरकारने मार्च २०२५ मध्ये म्यानमार आणि थायलँड येथील प्रकरणांतून सुमारे ५४९ भारतीयांची सुटका करून मायदेशी आणले होते.

काय आहे सायबर गुलामगिरी ?

सायबर गुन्हेगार चांगल्या पगाराची नोकरी किंवा इतर फायद्यांचे आमिष दाखवून लोकांना परदेशात घेऊन जातात. परदेशात पोहोचल्यावर, या लोकांकडून त्यांची इच्छा नसतानाही सायबर फसवणूक किंवा ऑनलाइन घोटाळे संबंधित कामे जबरदस्तीने करून घेतली जातात. काम करण्यास नकार दिल्यास किंवा दिलेले लक्ष्य पूर्ण न केल्यास, त्यांना शारीरिक त्रास दिला जातो, मारहाण केली जाते, आणि काही प्रकरणांमध्ये विजेचे झटके दिल्यासारखे शारीरिक अत्याचार केले जातात. त्यांना १२ ते १५ तास काम करण्यास भाग पाडले जाते. त्यांना दिलेले लक्ष्य पूर्ण होईपर्यंत अनेकदा उपाशी ठेवले जाते. या सायबर गुलामांकडून ‘सायबर फ्रॉड’चे काम करून घेऊन लोकांकडून पैसे लुटले जातात. कंबोडिया आणि म्यानमारसारख्या देशांमध्ये अशा प्रकारच्या ‘सायबर गुलामी’ची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. कंबोडिया हे ‘सायबर गुलामगिरीचे केंद्र’ मानले जाते.