मुंबई : सोलापूरसह मराठवाड्यातील भयावह पूरस्थितीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यातील प्राथमिक शिक्षक आणि सहाय्यक कृषी अधिकारी सरसावले असून, त्यांनी एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्याचे जाहीर केले आहे. शेतजमिनी, पिके आणि पशूधनाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या उपजिविकेचे गंभीर संकट निर्माण झाले आहे.
सहाय्यक कृषी अधिकारी आणि शेतकऱ्यांचे भावनिक नाते आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे काम आम्ही युद्धपातळीवर करूच पण, शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून आम्ही एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे, अशी माहिती सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विलास रिंढे यांनी दिली. तर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी एक दिवसाचे वेतन देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळविले आहे. राज्यातील पूर परिस्थितीचे भान राखून मदतीचा निर्णय घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तर आणि सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांचे कृषिमंत्री भरणे यांनी आभार मानले आहेत.
महाराष्ट्रातील अनेक भागात मोठा पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. या परिस्थितीची पाहणी करुन पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील सर्वच मंत्री विविध जिल्ह्यात जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करुन पूरग्रस्तांना दिलासा देत आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी हिंगोली जिल्ह्यात परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन नागरिकांना दिलासा दिला आहे.
या परिस्थितीचे भान राखून स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव आणि सरचिटणीस राजेश सुर्वे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.