मुंबई: तीन जिल्ह्यांमध्ये सहपालकमंत्री असले तरी त्यांच्या अधिकारांबाबत स्पष्टता नव्हती. यामुळेच सरकारने एका आदेशान्वये सहपालकमंत्र्यांच्या अधिकारांमध्ये स्पष्टता आणली आहे.
मुंबई उपनगरसह कोल्हापूर आणि बुलढाण्यातही सहपालकमंत्र्यांना अधिकार मिळाल्याने शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्र्यांवरही भाजपच्या सहपालकमंत्र्यांचा अंकुश राहणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारीमध्ये मुंबई उपनगरात मंगलप्रभात लोढा, कोल्हापूर माधुरी मिसाळ तर काही दिवसांपूर्वीच बुलढाणा जिल्ह्यात संजय सावकारे यांची सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती केली. या सहपालकमंत्र्यांची जबाबदारी निश्चित झाली नव्हती. सरकार दरबारी सहपालकमंत्र्यांच्या कामाबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे तब्बल आठ महिन्यानंतर सरकारने सहपालकमंत्र्यांची जबाबदारी स्पष्ट केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी विवक्षितपणे नेमून दिलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्याचे काम या सह पालकमंत्र्यांवर सोपविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील जनतेच्या तक्रारींचा निपटारा करण्याची कामगिरीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.