मुंबई : राज्यातील दुर्गम भागापर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोचविण्याच्या उद्देशाने प्रख्यात ‘स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ (स्टारलिंक) आणि राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागात करार करण्यात आला. इलाॅन मस्क यांच्या कंपनीने देशात सेवा सुरू करण्याचे जाहीर केल्यावर इंटरनेट सेवेसाठी या कंपनीबरोबर सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. स्टारलिंकतर्फे उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर आणि शासनातर्फे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

स्टारलिंक राज्य शासनाशी भागीदारी करीत असल्याने आपण राज्यातील शेवटच्या गावापर्यंतची डिजिटल दरी मिटवीत आहोत. दुर्गम भागातीलही प्रत्येक शाळा, आरोग्य केंद्र आणि गाव आता डिजिटल संपर्कात येणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्राचे समावेशक आणि लवचीक डिजिटल विकासाचे दृष्टिकोन आमच्याशी पूर्णपणे सुसंगत आहे. आपण उपग्रह इंटरनेटद्वारे शिक्षण, आरोग्य सेवा आणि ग्रामीण समुदायांना सक्षम बनविण्याचे उदाहरण घालू असे ‘स्टारलिंक’च्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर यांनी सांगितले.

प्रायोगिक टप्प्यातील मुख्य उद्दिष्टे

  • शासन व आदिवासी शाळा, आपले सरकार केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपग्रह इंटरनेट जोडणी प्रदान करणे
  • *आपत्ती प्रतिसाद आणि किनारी सुरक्षा व्यवस्थेतील संवाद सुधारणा
  • शिक्षण व आरोग्यसेवेसाठी उच्च-गती इंटरनेटद्वारे सुविधा उपलब्ध करून देणे
  • राज्य यंत्रणा आणि स्थानिक समुदायांसाठी प्रशिक्षण व क्षमता-विकास कार्यक्रम राबविणे

प्रायोगिक टप्पा पूर्ण झाल्यानंतर हा उपक्रम संपूर्ण राज्यभर विस्तारला जाईल. त्यामुळे महाराष्ट्र हे उपग्रहाधारित डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये राष्ट्रीय पातळीवर आघाडीवर असलेले राज्य ठरेल.