मुंबई : राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. पूरस्थितीचा शेतकऱ्यांबरोबरच विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसला. पूरग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची वह्या-पुस्तकांसह शैक्षणिक साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. त्यामुळे विद्यार्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे शेतकऱ्यांच्या घरांची पडझड होऊन शेतीचे नुकसान झाले. तसेच या जिल्ह्यांमधील शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची वह्या-पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य पाण्यामध्ये भिजून खराब झाले. पुरामुळे आर्थिक नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुन्हा विकत घेणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन छात्रभारती, युवासेना या विद्यार्थी संघटनांनी शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्या अनुषंगाने राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या बैठकीत पूरग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे, तसेच राज्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि अधिकारी उपस्थित होते.

अनेक विद्यार्थ्यांकडील शैक्षणिक साहित्य, साधने, पुस्तके असे सर्व पुरामुळे नष्ट झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे नवे साहित्य घेणेही सद्यस्थितीत परवडणारे नाही. त्यामुळे महाविद्यालये, विद्यापीठे आणि खाजगी शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, गणवेश अशा स्वरूपात सामाजिक कर्तव्य म्हणून विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. शैक्षणिक संस्थांच्या मदतीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांचे शिक्षण अखंडित सुरू राहील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.