मुंबई : राज्यातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या मुद्दे चव्हाट्यावर आणून रान उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची महाराष्ट्र सरकारला शाश्वत विकासाबाबत सल्ला देणाऱ्या आणि धोरण ठरविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या ‘इंन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (मित्रा) या संस्थेच्या मानद सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारला शाश्वत विकासाबाबत सल्ला देणारी संस्था म्हणून ‘मित्रा’ची ओळख आहे. या संस्थेच्या मानद सल्लागार पदी अनिश दामानिया यांची नियुक्ती झाली आहे. एकीकडे अंजली दमानिया राज्य सरकारमधील विविध भ्रष्टाचार आणि गैरप्रकाराच्या घटना उजेडात आणून खळबळ माजवित असतानाच पती अनिश यांची सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर वर्णी लागल्यामुळे दमानिया यांच्यावर टीका होत आहे.

मंत्री, माजी मंत्री वा लोकप्रतिनिधींची प्रकरणे उघडकीस आणणाऱ्या अंजली दमानिया यांचा बोलविता धनी कोण, अशी चर्चा नेहमीच राजकीय वर्तुळात घडत असते. कारण त्यांच्याकडे सरकारी सारी गोपनीय कागदपत्रे कशी येतात, अशी शंका घेतली जाते. त्याच वेळी त्यांच्या पतीची मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखालील मित्रा संस्थेच्या मानस सल्लागारपदी नियुक्ती झाल्याने चर्चा सुरू झाली आहे.

दमानिया यांच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) प्रदेश सरचिटणीस रोहित पवार यांनी समाज माध्यमावर एक संदेश प्रसारित करून उपरोधिक टिका केली आहे. ‘महाराष्ट्र सरकारच्या मित्रा या संस्थेवर मानद सल्लागार पदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन. एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून अंजली दमानिया सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत. आता अनिश दमानिया यांचे आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे. दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील समन्वय निश्चितच महत्त्वपूर्ण राहील. पुनश्च एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा.’ असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अंजली दमानिया यांनीही रोहित पवार यांच्या आरोपला प्रत्युत्तर दिले आहे. त्यांना समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे. ‘रोहित पवार यांचा समाज माध्यमावरील संदेश वाचल्यावर मला तितकस वाईट वाटले नाही. हे तर अपेक्षित होते. अनिश, हा त्याच्या ऑफिस मधील तिसरा असा व्यक्ती आहे, जो ‘एफआयसीसीआय’चा सभासद झाला. म्हणून त्याला ‘मित्रा’वर मानद सल्लागार म्हणून घेतले आहे. या पदावर काम केल्याबद्दल तो मानधन घेणार नाही. त्याला ना राजकारणाशी घेणे देणे आहे, ना सरकारशी.

माझ्यासारखेच त्यालाही देशाला पुढे नेण्यासाठी आपले योगदान द्यायचे आहे. हे वृत्त त्याने आणि मी आपआपल्या समाज माध्यमांवर प्रसारित केले आहे. त्यात लपवण्यासारखे काहीच नाही, मला तर त्याचा खूप अभिमान आहे.’