मुंबई : राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हे सिद्धता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येत आहे. मात्र विविध भागात बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्हीच्या देखभालीचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी हे कॅमेरे कुठे आणि कसे बसवायचे आणि त्याची दुरुस्ती करणारी एकच यंत्रणा तयार करून त्याचा कृती आराखडा लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
रवी शेठ पाटील यांनी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी भागात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे दुरुस्ती संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत प्रशांत बंब, भास्कर जाधव, प्रशांत ठाकूर, महेश शिंदे, श्रीजया चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणीस म्हणाले, राज्यात अनेक शहरात व अन्य ठिकाणी पोलीस विभाग, जिल्हा नियोजन समिती तसेच सीएसआर फंडातून आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतात.
या सीसीटीव्हींच्या देखभाल दुरुस्ती आणि सनियंत्रणासाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली(एसओपी) जाहीर केली जाईल. त्यात सीसीटीव्हीचा गॅरंटी कालावधी, देखभाल व दुरुस्तीची स्पष्ट जबाबदारी, फायबर कनेक्टिव्हिटीतील अडथळे, तसेच पोलीस विभाग व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांमधील समन्वय यांचा समावेश असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी येथील बंद सीसीटीव्ही कॅमेरा संदर्भात रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात येत असून या संदर्भात संबंधित कंपनीच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेण्यात आली आहे. बंद सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याच्या सूचना पोलीस विभागामार्फत देण्यात आल्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी सांगितले. तसेच रायगड येथील बंद असलेले शेती सीसीटीव्ही कॅमेरे सूरू करणे संदर्भात एक बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.