देशभरातील ११७ पैकी २२ स्थानके राज्यात; उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमात हिरहिरीने सहभागी होणाऱ्या रेल्वेने देशभरातील ११७ स्थानकांवर वायफायचे जाळे पसरवले आहे. विशेष म्हणजे रेल्वेच्या या वायफायच्या जाळ्याच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असून वायफाय यंत्रणा बसवलेल्या ११७ स्थानकांपैकी सर्वाधिक म्हणजे २२ स्थानके महाराष्ट्रातील आहेत. ‘अ’ आणि ‘अ१’ दर्जाच्या स्थानकांवर बसवण्यात येणाऱ्या या वायफाय सेवेसाठी ‘रेलटेल’ने गूगलशी करार केला आहे. या प्रकल्पांतर्गत ४०० स्थानकांवर वायफाय यंत्रणा बसवली जाणार आहे.

आपल्या पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी डिजिटल इंडिया या मोहिमेअंतर्गत देशभरातील ४०० स्थानकांवर वायफाय सेवा देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. या घोषणेनंतर मुंबई सेंट्रल स्थानकात देशातील पहिल्यावहिल्या वायफाय सेवेची सुरुवात झाली होती. ही सेवा गूगल रेलटेलच्या माध्यमातून पुरवणार असल्याचेही मुंबई सेंट्रल येथील कार्यक्रमात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केले होते. या सर्व ४०० स्थानकांवर वायफाय सेवा सुरू झाल्यानंतर ही सार्वजनिक ठिकाणी पुरवण्यात येणारी सर्वात मोठी वायफाय यंत्रणा ठरणार आहे.

मुंबई सेंट्रल येथून सुरू झालेल्या या प्रकल्पात महाराष्ट्रातील स्थानकांनी आघाडी घेतली आहे. रेल्वेने गूगलच्या मदतीने आतापर्यंत ११७ स्थानकांवर ही सेवा पुरवली आहे. त्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे २२ स्थानकांचा समावेश आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राज्यातील अनेक प्रकल्पांसाठी यंदा भरघोस निधी मंजूर केला आहे. पायाभूत सुविधांच्या या प्रकल्पांबरोबरच राज्यातील रेल्वेचे जाळे अधिक ‘स्मार्ट’ आणि तंत्रस्नेही व्हावे, प्रवाशांना उत्तम सेवा मिळावी, या साठी वाय-फाय सेवेचा विस्तार जास्तीत जास्त स्थानकांमध्ये करण्याचा रेल्वेमंत्र्यांचा मानस आहे. भविष्यातही राज्यभरातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असे नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राखालोखाल उत्तर प्रदेशातील १६, तामीळनाडूमधील १०, बंगालमधील आठ अशा स्थानकांचा समावेश आहे. गुजरातमधील केवळ चार स्थानकांचा यामध्ये आहेत.

या २२ स्थानकांपैकी १८ स्थानके मुंबई उपनगरीय सेवेच्या हद्दीतील आहेत. मुंबई सेंट्रल, चर्चगेट, वांद्रे, वांद्रे टर्मिनस, दादर (पश्चिम), दादर (मध्य), खार रोड, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, भायखळा, पनवेल, ठाणे, बोरीवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, बेलापूर, वाशी, पुणे, नागपूर, सोलापूर आणि औरंगाबाद या २२ स्थानकांमध्ये वायफाय सेवा सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.