Maharashtra Local Body Elections 2025 : करोना साथरोगापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यामुळे अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींची निवडणूक २ डिसेंबरला होणार आहेत. मतदारयाद्यांमधील घोळावरून महाविकास आघाडी आणि मनसेने राळ उठविल्यानेच दुबार मतदारांना रोखण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला होता. यानुसार पहिल्या टप्प्यात २८८ नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. २ डिसेंबरला मतदान तर दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ तारखेला मतमोजणी होणार आहे. एकूण ६,८५९ जागांसाठी मतदान होईल.

नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक असल्याने २८८ नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. काही ठिकाणी एका प्रभागात तीन सदस्य निवडून येतील. नगर पंचायतींमध्ये एक सदस्यीय प्रभाग आहेत. सुमारे एक कोटी मतदारांना दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा मतदान यंत्राची कळ दाबावी लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या टप्प्यात डिसेंबरअखेर जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती तर १५ जानेवारीच्या आसपास मुंबईसह २९ महानगरपालिकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

मतदारयाद्यांमधील घोळावरून महाविकास आघाडी आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मतदारयाद्यांमध्ये सुधारणा झाल्यावरच निवडणुका घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. पण विरोधकांची ही मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागेल, असे वाघमारे यांनी सांगितले.

ठळक वैशिष्ट्ये :

● निवडणूक होत असलेल्या नगरपालिका : २४६

● नगर पंचायती : ४२

● मतदान : २ डिसेंबर

● मतमोजणी : ३ डिसेंबर

● उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : १० ते १७ नोव्हेंबर

● छाननी : १८ नोव्हेंबर

● एकूण मतदार : १ कोटी ०७ लाख, ३ हजार, ५७६

● पुरुष मतदार : ५३ लाख, ७९ हजार, ९३१

● महिला मतदार : ५३ लाख, २२ हजार, ८७०

● इतर मतदार : ७७५

● मतदान केंद्रे : १३,३५५

मतदारांकडून हमीपत्र

● मतदारयाद्यांमधील दुबार नावे आयोगाकडून निश्चित केली जातील. या नावांपुढे दोन तारांकित चिन्हे नमूद केले जाईल.

● अशा मतदारांकडून ते कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्यात येईल. त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मतदान केंद्रांवरच मतदान करता येऊ शकेल.

● अन्य मतदान केंद्रावर त्यांना मतदानाचा अधिकार नसेल. मतदारांनी प्रतिसाद दिला नाही व ते मतदानासाठी आल्यास त्यांच्याकडून हमीपत्र घेतले जाईल.

● सध्या हे संभाव्य दुबार मतदार आहेत. मतदानाच्या दोन दिवस आधी नक्की दुबार नावे किती आहेत याची आकडेवारी प्राप्त होऊ शकेल, असे वाघमारे यांनी सांगितले.

१ जुलैचीच मतदार यादी ग्राह्य

नगरपालिका निवडणुकीसाठी १ जुलै २०१५ ची मतदारयादी ग्राह्य मानली जाईल. १५ ऑक्टोबरची यादी वापरण्यास मिळावी, अशी केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली होती. पण निवडणूक आयोगाकडून काहीच प्रतिसाद अद्याप मिळालेला नसल्याचे राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. बहुसदस्यीय निवडणूक असल्याने व्हीव्हीपॅटचा वापर करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होणार नाही.