फटाक्यांचा आवाज कमी झाल्याची नोंद आणि जनजागृती याबाबत कितीही चर्चा झाली तरी यावर्षीही फटाक्यांमुळे हवा व ध्वनीप्रदूषण झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीमध्ये दिसून आले आहे. आवाजी फटाक्यांपेक्षा शोभेच्या फटाक्यांकडे ग्राहक वळत असले तरी त्यांच्यामुळेही ध्वनी व हवा प्रदूषण होत असल्याचेच हे निदर्शक आहे.
दिवाळीपूर्वी मंडळाने घेतलेल्या चाचण्यांमध्ये सुतळी बॉम्बचा आवाज प्रथमच आवाजाच्या मर्यादेच्या पातळीपेक्षा कमी असल्याची सकारात्मक नोंद झाली होती. मात्र दिवाळीच्या चार दिवसांमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील ४५ ठिकाणी केलेल्या आवाजाच्या नोंदणीत सर्वत्रच आवाजाची पातळी ओलांडली गेली. २०१२ पासून गेल्या तीन वर्षांतील आवाजाच्या पातळीची तुलना करता प्रत्येक ठिकाणच्या नोंदीत चढउतार असले तरी सरासरी आवाजाची पातळी ७० ते ८० डेसिबलपर्यंत राहिली आहे. ध्वनी नियंत्रण नियमांनुसार रहिवासी भागात सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत आवाजाची पातळी ५५ डेसिबल व रात्री ४५ डेसिबल असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात रात्री दहापर्यंतची वेळेची मर्यादा न पाळता मध्यरात्रीपर्यंत फटाके फुटत होते. त्यामुळे लक्ष्मीपुजनादिवशीही रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत आवाजाची पातळी खाली आली नव्हती. प्रभादेवी व दहिसरमध्ये तर रात्रीही ८० डेसिबलपेक्षा अधिक आवाज नोंदला गेला.
दक्षिण मुंबईत पूर्वी फटाक्यांचे प्रमाण अधिक होते. मात्र गेल्या काही वर्षांत हे चित्रही पालटले आहे. पश्चिम व पूर्व उपनगरेही फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणात अजिबात मागे नाहीत. गोरेगाव, बोरीवली, दहिसर, घाटकोपर या भागात फटाक्यांचा धूर अधिक निघत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
सततची बांधकामे, वाहनांमधून बाहेर पडणारा धूर यामुळे मुंबईतील रस्त्यांवर हवा प्रदूषित होण्याचे प्रमाण नेहमीच जास्त असते. मात्र दिवाळीत हवेतील धुलिकणात अधिक वाढ झाल्याची नोंद महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वांद्रे येथील केंद्रात झाली. २१ ते २६ ऑक्टोबर या काळात हवेतील धूलिकणांचे प्रमाण १०० मायक्रॉन प्रति घनमीटर या मर्यादेपेक्षा दीडपटीने वाढले होते.