मुंबई : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार ‘परख’ या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत ४ डिसेंबर २०२४ रोजी देशपातळीवर करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्राने देशात आठवे स्थान पटकावले आहे. या सर्वेक्षणातून इयत्ता तिसरी, सहावी व नववीतील विद्यार्थ्यांचे भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास या विषयांमधील संपादणूक क्षमता तपासण्यात आली. राज्यातील ४ हजार ३१४ शाळा, १३ हजार ९३० शिक्षक आणि १ लाख २३ हजार ६५९ विद्यार्थ्यांमधून हे सर्वेक्षण करण्यात आले. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ व परख राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४ यांची तुलना करता इयत्ता ९ वीचा गणित विषय वगळता महाराष्ट्राच्या सरासरी संपादणूकमध्ये ३ टक्के वाढ झाली आहे.
इयत्ता तिसरी, सहावी आणि नववीमधील विद्यार्थ्यांचे भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास या विषयांमधील संपादणूक पडताळणी करण्यात आली. या सर्वेक्षणात राज्यातील ४ हजार ३१४ शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये शासकीय शाळांचे प्रमाण २९ टक्के, अनुदानित शाळांचे प्रमाण ३२ टक्के, खासगी शाळांचे प्रमाण ३३ टक्के आणि केंद्र सरकारच्या शाळांचे प्रमाण ७ टक्के होते. तसेच राज्यातील १३ हजार ९३० शिक्षकांसह १ लाख २३ हजार ६५९ विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये मुलींचे प्रमाण ४९ टक्के आणि मुलांचे प्रमाण ५१ टक्के इतके होते. शहरी भागातील ५१ टक्के आणि ग्रामीण भागातील ४९ टक्के मुलांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांच्या केलेल्या मूल्यांकनामध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा महाराष्ट्राची सरासरी ही वरचढ आहे. इयत्ता तिसरीच्या संपादणुकीमध्ये पंजाब अव्वल स्थानी असून, महाराष्ट्राने सहावा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये भाषा विषयाची राज्य संपादणूक सरासरी ६९ टक्के असून, राष्ट्रीय सरासरी ६४ टक्के इतकी आहे. गणित विषयामध्ये राज्य सरासरी ६४ टक्के तर, राष्ट्रीय सरासरी ६१ टक्के इतकी आहे. शासकीय शाळांमधील मुली, ग्रामीण विद्यार्थी यांची कामगिरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगली नोंदवली गेली.
इयत्ता सहावीमध्ये संपादणुकीमध्ये केरळने अव्वल स्थान पटकावले असून, महाराष्ट्र ७ व्या स्थानावर आहे. यामध्ये भाषा विषयाची संपादणूक सरासरी ६२ टक्के असून राष्ट्रीय सरासरी ५७ टक्के इतकी आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा राज्य सरासरी पाच टक्क्यांनी जास्त आहे. गणितामध्ये राज्याची सरासरी ५१ टक्के तर राष्ट्रीय सरासरी ४६ टक्के आहे. त्याचप्रमाणे परिसर अभ्यासामध्ये राज्याची संपादणूक सरासरी ५५ टक्के तर राष्ट्रीय सरासरी ४९ टक्के इतकी आहे.
इयत्ता नववीमध्ये पंजाब अव्वल ठरले असून, महाराष्ट्राने १० वा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये भाषा विषयाची राज्याची संपादणूक सरासरी ५९ टक्के तर राष्ट्रीय सरासरी ५४ टक्के, गणिताची राज्य सरासरी ३८ टक्के तर, राष्ट्रीय सरासरी ३७ टक्के, विज्ञान विषयाची राज्य सरासरी ४२ टक्के, तर राष्ट्रीय सरासरी ४० टक्के, सामाजिक शास्त्र विषयाची राज्य सरासरी ४३ टक्के, तर राष्ट्रीय सरासरी ४० टक्के इतकी आहे. इयत्ता नववीतील मुलींनी भाषा व सामाजिक शास्त्र विषयात सरासरीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांतील ग्रामीण विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. सरकारी शाळांनी उत्तम कामगिरी केली असली तरी माध्यमिक स्तरावर सुधारणा आवश्यक आहे.
कोल्हापूर जिल्हा अव्वल
सर्वेक्षणामध्ये कामगिरीनुसार जिल्ह्यांची संपादणूक तपासण्यात आली. यामध्ये तिसरी, सहावी व नववी या तिन्ही इयत्तांमध्ये कोल्हापूर संपादणुकीमध्ये सर्वोत्तम ठरले आहे. इयत्ता तिसरीमध्ये कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, जळगाव यांची कामगिरी उत्तम आहे. तर लातूर, गडचिरोली, मुंबई उपनगर, नागपूर, पालघर हे जिल्हे तुलनात्मदृष्ट्या कमी कामगिरी करणारे ठरले आहेत. तसेच इयत्ता सहावीसाठी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, मुंबई, रत्नागिरी या जिल्ह्यांची कामगिरी उत्कृष्ट ठरली असून, वर्धा, औरंगाबाद, गोंदिया, गडचिरोली, रायगड यांची कामगिरी निराशाजनक आहे. त्याचप्रमाणे इयत्ता नववीसाठी कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई यांची कामगिरी उत्तम असून, मुंबई उपनगर, अकोला, नंदुरबार, परभणी, गडचिरोली हे जिल्हे तुलनात्मदृष्ट्या कमी कामगिरी करणारे ठरले आहेत.
देशपातळीवर सर्वोत्तम संपादणूक मिळवणारे जिल्हे
संपादणुकीमध्ये इयत्ता तिसरीमध्ये कोल्हापूरने देशपातळीवर २६ वे स्थान, तर सोलापूरने ४० वे स्थान पटकावले आहे. त्याचप्रमाणे इयत्ता सहावीमध्ये कोल्हापूरने १० वे तर मुंबईने ४५ वे स्थान पटकावले आहे. तसेच इयत्ता नववीमध्ये पाच जिल्ह्यांनी पहिल्या ५० मध्ये येण्याचा मान पटकावला आहे. यामध्ये कोल्हापूरने १४ वा, साताऱ्याने ३७ वा, रत्नागिरीने ४१ वे, सिंधुदुर्गने ४२ वे आणि मुंबईने ५० वे स्थान पटकावले आहे.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ व परख राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४ तुलना
वर्ग – विषय – २०२१ – २०२४ – फरक
इयत्ता तिसरी – भाषा – ६७% – ६९% – २% वाढ
इयत्ता तिसरी – गणित – ६१% – ६४% – ३% वाढ
इयत्ता सहावी – भाषा – ५९% – ६२% – ३% वाढ
इयत्ता सहावी – गणित – ४५% – ५१% – ६% वाढ
इयत्ता सहावी – परिसर अभ्यास – ५१% – ५५% – ४% वाढ
इयत्ता नववी – भाषा – ५७% – ५९% – २% वाढ
इयत्ता नववी – गणित – ४०% – ३८% – २% घट
इयत्ता नववी – विज्ञान – ३९% – ४२% – ३% वाढ
इयत्ता नववी परिसर अभ्यास – ४०% – ४२ % – २% घट