मुंबई : ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षेमार्फत प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

व्यावसायिक प्रवेश परीक्षेसाठी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, तसेच तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर उपस्थित होते. राज्यातील विद्यार्थ्यांना तांत्रिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी संगणक सुविधांसह सुसज्ज अशी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्यात येत आहेत. ही केंद्रे विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची तपासणी, समुपदेशन आणि मार्गदर्शन याबाबत मदत करतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ प्रत्येक जिल्ह्यातील दोन नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये उभारण्यात येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक सहाय्यता देणे, तसेच विविध शंका निरसन करणे ही केंद्रांची प्रमुख भूमिका असेल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू होणाऱ्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत या केंद्रांची मदत होईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.