Mumbai Thane Heavy Rainfall Alert : मुंबई आणि ठाण्याला शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपले. मुंबईसह ठाणे, पालघर भागात सोमवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र संपूर्ण राज्यात मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मागील आठवड्यात राज्याच्या विविध भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यानंतर पावसाचे सावट ओसरले होते. मुंबईत गेले काही दिवस तर पावसाने विश्रांती घेतली होती. अधूनमधून हलक्या सरी बरसत होत्या. दरम्यान, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरात शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या भागात रविवारी पहाटेही पावसाचा जोर कायम होता. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर या उपनगरांना सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. मुंबईत काही ठिकाणी पाणी साचल्याने दुपारपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मिमी ९३.२, तर सांताक्रूझ येथे ५४.७ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, १ जून ते २८ सप्टेंबरपर्यंत कुलाबा केंद्रात २६४७.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३४०१.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मोसमी पावसाचा हंगाम ३० सप्टेंबरला संपतो. त्याआधी राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडला आहे. अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर आता मात्र मंगळवारपासून राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येताच राज्यात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, राज्यात सोमवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मंगळवारपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरेल. त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात काही भागात परतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

२४ तासांत १०० मिमी पाऊस

मुंबईत शनिवारी सायंकाळनंतर पावसाने जोर धरला होता. त्यानंतर शनिवारी मध्यरात्री पावसाचा जोर आणखी वाढला आणि रविवारी पहाटेपर्यंत कायम होता. शनिवारी सकाळी ८.३० ते रविवारी सकाळी ८.३० पर्यंत कुलाबा येथे १२०.८ मिमी, जुहू ८८ मिमी, सांताक्रूझ ८३.८ मिमी, वांद्रे ८२.५ मिमी आणि आणि महालक्ष्मी येथे २८ मिमी पावसाची नोंद झाली. याआधी २६ सप्टेंबर २०२४ रोजी २४ तासांत सांताक्रूझ येथे १७०.३ मिमी पावसाची नोंद झाली होती.

पावसाचा अंदाज कुठे

अतिमुसळधार पाऊस

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाट परिसर

मुसळधार पाऊस

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक , सातारा घाट परिसर

मेघगर्जनेसह पाऊस

अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर