मुंबई: नांदेड विशेषे ट्रेनमध्ये डॉक्टर दांपत्यावर हल्ला करणाऱ्या चोराच्या शोधासाठी पोलिसांनी रेखाचित्र तयार केले आहे. गुरूवारी मध्यरात्री झालेल्या या हल्ल्यात पनवेल येथील देशमुख दांपत्य ट्रेनधून खाली पडले आणि डॉ. योगेश देशमुख यांचा एक हात निकामी झाला. हा चोर सराईत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
डॉ. योगेश देशमुख (५०) आणि डॉ. दिपाली देशमुख (४४) हे दाम्पत्य पनवेल येथे राहतात. देशमुख यांचे पनवेलमधील कामोठे येथे सदगुरू कृपा आयुर्वेद रुग्णालय आहे. देशमुख दाम्पत्य ९ वर्षांची मुलगी श्रध्दा समेवत बुधवारी नांदेड येथे नातेवाईकाकाडे जाण्यासाठी निघाले होते. लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथून त्यांनी मध्यरात्री १ ची एलटीटी – नांदेड विशेष ट्रेन पकडली. तिघे एस-४ बोगीत चढले. दिपाली देशमुख मधल्या बर्थवर झोपल्या होत्या. त्यांचे पती योगेश वरच्या बर्थवर आणि मुलगी श्रध्दा समोरील बर्थवर झोपली होती. मध्यरात्री एक अनोळखी इसम ट्रेनमध्ये शिरला. पहाटे ३.३० च्या सुमारास त्याने डॉ. दिपाली देशमुख यांच्या खाद्यावरील पर्स खेचण्याच्या प्रयत्न केला. दिपाली यांनी त्याला प्रतिकार केला. या खेचाखेचीत त्या अनोळखी व्यक्तीने त्यांना ट्रेनमधून खाली खेचले आणि त्या खाली पडल्या. तो गोंधळ पाहून डॉ. योगेश उठले, पत्नी दिपाली खाली पडल्याचे बघताच त्यांनी ट्रेनमधून खाली उडी मारली. त्यात त्यांचा डावा हात निकामी झाला. त्यांच्यावर मुलुंडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपी सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी ट्रेनमध्ये झोपलेल्या महिलांच्या बॅगा अलगद खेचून पळण्याची त्याची कार्यपध्दती आहे, असे कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी सांगितले. ही घटना भांडुप आणि कांजूर रेल्वे मार्गादरम्यान घडली. तेथे सीसी टीव्ही कॅमेरे नाहीत, मात्र तेथून बाहेर पडण्यासाठी एकमेव मार्ग असून तेथील सीसी टीव्ही आम्ही तपासत आहोत, असे यादव यांनी सांगितले. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी विविध पथके तयार केली आहेत. फिर्यादी डॉ. देशमुख यांना आरोपीचा चेहरा नीटसा बघता आला नाही. मात्र त्यांनी दिलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र तयार केले आहे. याशिवाय विविध सराईत गुन्हेगारांची छायाचित्रे त्यांना दाखविण्यात आली आहे. मात्र शुक्रवार संध्याकाळपर्यंत आरोपीची ओळख पटली नव्हती. या अपघातात डॉ. योगेश देशमुख यांचा डावा हाता पूर्णपणे निखळला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. दिपाली देशमुख यांच्या बॅगेत ५ हजार रुपये होते. या झटापटीत चोर त्यांची बॅग पळविण्यात यशस्वी झाला होता. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात कलम ३०९ (४) आणि ३०९(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४ दिवसातील दुसरी घटना
चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याची मागील चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे. २ जून रोजी जयपूर वांद्रे एक्स्प्रेसमध्ये अंधेरीजवळ चालत्या गाडीत चौघांनी दरोडा घातला. त्यांनी एका दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटले. यावेळी या दाम्पत्याने त्यांना जोरदार प्रतिकार केला, मात्र आरोपी त्यांच्याकडील ७ लाखांचा मुद्देमाल असलेली बॅग पळवून नेण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पाठोपाठ ही दुसरी दुर्घटना घडली. यामुळे रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.