मुंबई : कुटुंब, प्रेम आणि मैत्रीची रंगतदार कहाणी असणारा मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक हा नवीन मराठी चित्रपट शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाच्या शीर्षकाचे समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकाशी साधर्म्य असल्याने काही हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटाला तीव्र विरोध केला आणि पुण्यासह विविध ठिकाणी गोंधळ घालून खेळ बंद पाडण्यात आले. या पार्श्वभूमीवर मृण्मयी देशपांडे हिने चित्रपटाचे प्रदर्शन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून गुरुवार, १६ ऑक्टोबरपासून नवीन नावासह पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे.
‘मना’चे श्लोक चित्रपटाची पहिली झलक समोर आल्यानंतर शीर्षकावरून वादंग पेटला आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला. तसेच, चित्रपटाच्या शीर्षकासाठी मनाचे श्लोक या शब्दांचा वापर करणे समर्थ रामदास स्वामी यांच्या अनेक अनुयायांचा अनादर करण्यासारखे आहे. त्यामुळे, चित्रपटाच्या प्रमाणपत्राला आणि प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी सज्जनगड येथील समर्थ सेवा मंडळाच्यावतीने उच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने गुरूवार, ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत ‘मना’चे श्लोक सिनेमा प्रदर्शित करण्यास हिरवा कंदील दाखवला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित करण्यात आला. मात्र पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटगृहात जाऊन आक्षेप घेतला आणि गोंधळ घालत शो बंद पाडले. हे तणावपूर्ण वातावरण चिघळू नये, यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री व दिग्दर्शक मृण्मयी देशपांडे हिने चित्रपटाचे प्रदर्शन थांबवित,
गुरुवार, १६ ऑक्टोबरपासून नवीन नावासह पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण घटनेनंतर मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी मृण्मयी देशपांडे हिला पाठिंबा दिला असून, शो बंद पाडणाऱ्यांचा तीव्र निषेध केला आहे.
मृण्मयी देशपांडेची समाजमाध्यमावरून माहिती
‘मना’चे श्लोक या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून पुणे, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या, त्या अतिशय दुःखद आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आम्ही या चित्रपटाचे प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत आणि नवीन नावासह हा चित्रपट गुरुवार, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा एकदा प्रदर्शित करत आहोत. भेटुयात!, अशी पोस्ट मृण्मयी देशपांडे हिने समाजमाध्यमावर करीत चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत माहिती दिली आहे.