मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाप्रमाणेच मुंबईतील प्रत्येक विभागात अधिकृत कबुतरखाने सुरू व्हायला हवेत, अशी अपेक्षा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली. मानवी वस्तीपासून दूर अशी ठिकाणे निवडून मुंबईतील प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत कबुतरखाने सुरू करावेत, असे मत लोढा यांनी व्यक्त केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाप्रमाणेच रेसकोर्स, आरे वसाहत, बीकेसी, सागरी किनारा मार्ग परिसर या ठिकाणी कबुतरखाने सुरू करावेत, अशी मागणी लोढा यांनी केली आहे.
मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने तत्काळ मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने दुसऱ्याच दिवशी दादरच्या प्रसिद्ध कबुतरखान्यावर कारवाई केली होती. कबुतरखान्यावरील अनधिकृत बांधकाम हटवले, तसेच कबुतरांसाठी जमा केलेले खाद्यही हटवले. पालिकेच्या या कारवाईच्या विरोधात काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने कबुतरखाना बंद करण्यासंबंधी आदेश दिले होते.
या प्रकरणाचा वाद अद्याप संपलेला नसताना दोनच दिवसांपूर्वी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात एका जैन मंदिरालगत नवीन कबुतरखाना सुरू करण्यात आला आहे. लोढा यांच्या हस्ते या कबुतरखान्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी लोढा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्येक विभागात असे कबुतरखाने सुरू करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
कबुतरांना खाद्यही मिळेल आणि मानवाच्या आरोग्यालाही त्रास होणार नाही अशा ठिकाणांची निवड करून कबुतरखाने सुरू करावे, अशी अपेक्षा लोढा यांनी व्यक्त केली. या प्रश्नावर मध्यममार्ग काढून मानवी वस्तीपासून लांब असलेली ठिकाणे शोधून त्या ठिकाणी कबुतरखाने सुरू केल्यास कोणाचेही काहीही आक्षेप नसतील, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. कबुतर हे निसर्गाचा भाग आहे. काही प्राणी-पक्षी हे काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत. मात्र कबुतर ही प्रजाती मोठ्या संख्येने आहे. तसेच केवळ मुंबईतच नाही, तर परदेशातही नागरिक कबुतरांना धान्य घालतात. त्यामुळे कबुतरांना धान्य टाकण्यात काहीही वावगे नसल्याचेही मत लोढा यांनी व्यक्त केले आहे.
कबुतरांच्या विषयावर न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सुवर्णमध्य काढण्याचे आवाहन लोढा यांनी यापूर्वी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्राद्वारे केले होते. बीकेसी, रेसकोर्स, आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांसारख्या मोकळ्या जागांवर कबुतरांना खाद्य घालण्यासाठी सुरक्षित व नियंत्रित आहार क्षेत्र म्हणून निश्चित करावे, अशीही मागणी त्यांनी केली होती. त्याचाच लोढा यांनी पुनरुच्चार केला.