मुंबई : पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले असून, बाहेरगावी गेलेले आणि सुट्टीवर असलेला नोकरदार वर्ग सोमवारी कर्तव्यावर जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील सीएसएमटी दिशेकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असेल. या प्रवाशांची गर्दी आणि मराठा आंदोलकांची गर्दी एकमेकांसमोर येण्याची चिन्हे आहेत. मराठा आंदोलक सीएसएमटीत ठाण मांडून बसले असल्याने दैनंदिन प्रवाशांना प्रवास करताना गैरसोय होण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सवाची सुट्टी असल्याने, सीएसएमटीकडे येणाऱ्या नोकरदार वर्गाची संख्या कमी होती. तसेच रेल्वे प्रशासन व इतर प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले होते की, आवश्यक आणि अपरिहार्य असेल तरच सीएसएमटीला प्रवास करा. त्यामुळे प्रवाशांची संख्या तुरळक होती. गेल्या तीन दिवसांपासून सीएसएमटीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, गावावरून येणारे प्रवासी आणि मराठा आंदोलक दिसत होते. परंतु, मराठा आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात बस्तान बसवले असून घोषणाबाजी, नाचगाणे, जल्लोष सुरू आहे. अशीच परिस्थिती सोमवारी असल्यास, सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रवाशांना सीएसएमटी स्थानकात उतरून, कार्यालयीन स्थळी पोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल.

सोमवारी नोकरदार वर्ग कार्यालयीन स्थळी जाणार असल्याने, वाहतुकीत अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी गरज नसल्यास सीएसएमटी जंक्शन व आसपासच्या भागाकडे जाणे टाळावे. याशिवाय जे.जे. मार्गावरील वाहतूक एमआरए मार्ग पोलीस ठाण्यापासून पोलीस आयुक्त कार्यालयाद्वारे मेट्रो सिनेमा जंक्शन कडे वळवण्यात येईल. तसेच पूर्व मुक्त मार्गावरील वाहतूक परिस्थितीनुसार जे.जे. मार्गाकडे वळवली जाऊ शकते. त्याबाबत पोलिसांकडून योग्य त्या सूचना देण्यात येणार आहेत. तसेच डी.एन. रोड (उत्तर दिशेची वाहतूक) फॅशन स्ट्रीटमार्गे मेट्रो सिनेमाकडे वळवण्यात येईल.

रेल्वे प्रशासन गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सीएसएमटीत सुमारे ३५० सुरक्षा रक्षकांचे पथक तैनात केले आहे. तर, राज्य सरकारच्या मदतीशिवाय किंवा राज्य सरकारने कोणताही उपाय किंवा सूचना न दिल्यास, रेल्वे प्रशासन काही करू शकत नाही. राज्य सरकार जे काही निर्णय घेईल, त्याला सहकार्य केले जाईल. – डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

१० रुपयांत परतीचे तिकीट घ्या

मराठा आंदोलक १० रुपयांचे परतीचे तिकीट खरेदी करून, सीएसएमटी स्थानकात ठाण मांडून बसले आहेत. सीएसएमटी ते मशीद बंदर दरम्यानचे १० रुपयांचे परतीचे तिकीट काढून, रेल्वे स्थानकात रात्री १२ वाजेपर्यंत स्थानकात थांबत आहेत. तसेच मराठा आंदोलक चर्चगेट स्थानकात जाऊन मोबाइलची चार्जिंग करून, शौचालयाचा वापर करून आझाद मैदानात जात आहेत.

मध्य आणि पश्चिम रेल्वेद्वारे दररोज ७५ लाख प्रवाशांचा प्रवास होतो. आझाद मैदानाच्या जवळील रेल्वे स्थानक सीएसएमटी असल्याने, या स्थानकात मराठा आंदोलकांची गर्दी प्रचंड आहे. त्या तुलनेत पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकात मराठा आंदोलक कमी आहेत. परंतु, सोमवारी रेल्वे प्रवाशांचा लोकल प्रवास सुरू झाल्यास दोन्ही मार्गावरील प्रवाशांचा प्रवास कसोटीचा ठरणार आहे.

सीएसएमटी दरम्यान वेगमर्यादा

सीएसएमटी रेल्वे स्थानकात लोकल दाखल करतेवेळी लोकलचा वेळ कमी ठेवण्याच्या सूचना मोटरमनला रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच, प्रत्येक स्थानकात लोकल काही सेकंद अधिक थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.