मुंबई : आझाद मैदान परिसरात सुरू असलेले अन्नछत्र चर्चेचा विषय ठरला आहे. राज्याच्या विविध भागातून शुक्रवारपासून आलेले मराठा आंदोलक मुंबईतील आझाद मैदानातीलआंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांच्या जेवणाची होत असलेली आबाळ पाहून संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. विविध जिल्ह्यांतून जेवणाचे टेम्पो आझाद मैदानात दाखल होत आहेत. प्रत्येकाला आग्रहाने बोलावून जेवण दिले जात आहे.
भाकरी, चटण्या, ठेचा, पुरणपोळी…
पहिले दोन दिवस आंदोलकांची खूप आबाळ झाली होती. त्यामुळे राज्यातील समाजबांधव मदतीसाठी सरसारवले आणि आपापल्या परिने जमेल तो शिधा घेऊन ते मुंबई आले. आझाद मैदान परिसरात असंख्य टेम्पो जेवणाचे पदार्थ घेऊन आले आहे. त्यात भाकरी, विविध प्रकारच्या चटण्या, लोणचे, पिठले, खर्डा, शिरा, पुरणपोळी आदींचा समावेश आहे. याशिवाय शेतातील ताजी फळेही आणण्यात आली आहेत. येणाऱ्या – जाणाऱ्या प्रत्येकाला बोलावून खाण्याचा आग्रहा केला जात आहे. काही ठिकाणी गरमागरम चहा दिला जात आहे. यामुळे आंदोलक, बंदोबस्तासाठी तैनात पोलीस, आणि परिसराती नागरिक या जेवणाचा आस्वाद घेत आहेत. हे आमच्या लोकांनी घरातून बनवून आणले आहे, त्याचा आस्वाद घ्या, असे आंदोलक नागरिकांना सांगत आहेत.