मुंबई : मराठी एकांकिका, नाटक, मालिका आणि चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता तुषार घाडीगावकर याने मानसिक तणावातून शुक्रवार, २० जून रोजी आत्महत्या केली. तो ३४ वर्षांचा होता. तुषारच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी भांडुप स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मित्रमंडळी व कलाकार उपस्थित होते. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

तुषार घाडीगावकर याचे बालपण भांडुप परिसरात गेले होते. मुंबईतील डी. जी. रुपारेल महाविद्यालयातील नाट्य विभागात सक्रिय राहून त्याने विविध एकांकिकांमधून काम केले. अभिनयासह लेखन व दिग्दर्शन करणारा तुषार एकांकिका विश्वात प्रसिद्ध होता. महाविद्यालयीन जीवनानंतर तुषारचा मालिका व चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध मालिकांमधून लक्षवेधी भूमिका साकारत तुषार घराघरात पोहोचला. त्याने ‘लवंगी मिरची’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटांमध्येही तुषार झळकला होता. ‘संगीत बिबट आख्यान’ या नाटकातही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. अलीकडेच ‘सन मराठी’ वाहिनीवर सुरू झालेल्या ‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेतही झळकला होता. चित्रपट, मालिका व नाटक असा प्रवास सुरू असतानाच तुषारने अचानक टोकाचा निर्णय घेतल्यामुळे मराठी मनोरंजनसृष्टी व मित्रमंडळींना धक्का बसला आहे. अनेक सहकलाकारांनीही तुषारसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.