मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावरून परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर ड्रोन घिरट्या घालत असल्याचे सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले. यावरून ठाकरे गटाकडून भाजपकडून मातोश्री निवासस्थानावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ड्रोनला माताेश्रीत डोकावण्याची आणि पकडले गेल्यानंतर उडून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे का, असा सवाल शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर सकाळच्या सुमारास ड्राेन घिरट्या घालत असल्याची बाब तेथील सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आली. त्याचप्रमाणे या ड्रोनचा व्हिडिओही समोर आला. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने तसेच संवेदनशील ठिकाणी ड्रोन उडविण्यास सक्त मनाई असताना हे ड्रोन दिसल्याने संशय व्यक्त करण्यात आला. यामागे कोणती अतिरेकी पार्श्वभूमी आहे का? या घटनेमागे षडयंत्र लपले असून याचा शोध घेणे आवश्यक आहे.
झेड सुरक्षा असलेल्या ‘मातोश्री’ निवास्थानाबाहेर ड्रोन उडवले जात असेल तर सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी व मातोश्री निवासस्थानाची सुरक्षा वाढविण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते अनिल परब यांनी केली तर भाजपकडूनच पाळत ठेवण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी केला.
एमएमआरडीएच्या कामांसाठी ड्रोन – पोलिसांचा खुलासा
यावर पोलिसांकडून स्पष्टीकरण करण्यात आले असून एमएमआरडीच्या कामांचे सर्वेक्षण सुरू असून त्यासाठी हा ड्रोनचा वापर करण्यात आला होता. एमएमआरडीएकडून परिसरातील कामांची पाहणी या ड्रोनद्वारे केली जात होती. यासाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली होती, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
घरात डोकावून पाहण्याची परवानगी कशी मिळते – आदित्य ठाकरे
आमच्या निवासस्थानात डोकावून पाहताना एक ड्रोन दिसला. एमएमआरडीएकडून पोलिसांच्या परवानगीने बीकेसीसाठी सर्वेक्षण केले जात होते, असे सांगण्यात आले. कोणत्या सर्वेक्षणात तुम्हाला घरांमध्ये डोकावून पाहण्याची आणि पकडले जाताच तत्काळ उडून जाण्याची परवानगी मिळते, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. रहिवाशांना यासंदर्भात माहिती का दिली गेली नाही? एमएमआरडीएकडून बीकेसीसाठी फक्त आमच्याच घरावर पाळत ठेवली जात आहे का? असे सवाल करताना याऐवजी एमएमआरडीने अटल सेतूसारख्या निकृष्ट कामांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
