मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी उपनगरी विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे धीम्या मार्गावरील कोपर, ठाकुर्ली स्थानकात लोकल थांबा नसेल. या दोन्ही स्थानकात जलद मार्गावरील फलाटाचा अभाव असल्याने, रविवारी तेथे लोकल थांबणार नाही. त्यामुळे या प्रवाशांना कल्याण, डोंबिवली किंवा दिवा या स्थानकात जाऊन पुढील प्रवास करावा लागेल. तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वे मुख्य मार्ग
कुठे : ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान
परिणाम : मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकातून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.५३ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या /अर्ध जलद लोकल, मुलुंड – कल्याणदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या लोकल ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील. तसेच या लोकल वेळापत्रकाच्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे १० मिनिटे उशिरा पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.५१ दरम्यान सुटणाऱ्या अप धिम्या/अर्ध जलद लोकल, कल्याण – मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील व नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्याकरीता निर्धारित लोकल डाऊन धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. सीएसएमटी येथून सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान सुटणाऱ्या व तेथे येणाऱ्या सर्व अप व डाऊन धीम्या लोकल सुमारे १० मिनिटे उशिराने पोहोचतील.
हार्बर मार्ग
कुठे : पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर (पोर्ट मार्गिका वगळून)
कुठे : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ दरम्यान
परिणाम : हार्बर मार्गावरील पनवेल येथून सकाळी १०.३३ ते सायंकाळी ५.०७ दरम्यान सीएसएमटी येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.४४ दरम्यान पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ४.२६ दरम्यान ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ४.२४ दरम्यान पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
ब्लॉक काळात सीएसएमटी – वाशी विभागात विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक काळात पोर्ट मार्गावरील रेल्वे सेवा उपलब्ध असेल.