मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळला जोडणारी मेट्रो ८ मार्गिका मार्गी लावण्याच्या दिशेने सिडकोने अखेर आता महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मेट्रो ८ च्या सविस्तर प्रकल्प आराखड्याचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार या कामासाठी सल्लागार नियुक्त करण्याकरीता मंगळवारी सिडकोने निविदा जारी केल्या.
आराखड्याचे पुनरावलोकन पूर्ण झाल्यास ही मार्गिका सिडको आणि खासगी कंपनीच्या माध्यमातून खासगी-सार्वजनिक सहभागातून मार्गी लावली जाणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो जाळ्यातील एक महत्त्वाची मेट्रो मार्गिका म्हणजे मेट्रो ८. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान मेट्रो ८ मार्गिका धावणार आहे. या मार्गिकेची एकूण लांबी अंदाजे ३५ किमी असून मार्गिकेच्या उभारणीसाठी अंदाजे १५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही मार्गिका मुंबई आणि नवी मुंबई अशा दोन महानगरातून जाणार असून या दोन महानगरांमधील अंतर कमी होणार आहे.
ही मार्गिका कार्यान्वित झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ प्रवास दीड-दोन तासांऐवजी केवळ ३० मिनिटांत होणार आहे. या मार्गिकेचे काम हाती घेतल्यापासून ती कार्यान्वित करण्यासाठी किमान सहा वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.
या मार्गिकेची उभारणी सिडकोच्या क्षेत्रात सिडकोकडून, तर एमएमआर क्षेत्रात एमएमआरडीएकडून केली जाणार होती. त्यानुसार एमएमआरडीएने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मानखुर्द दरम्यानच्या १०.१ किमी लांबीच्या मेट्रो ८ मार्गिकेतील टप्प्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा दिल्ली मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून तयार करून घेतला होता.
तर सिडकोने आराखड्याची तयारी सुरू केली होती. असे असताना राज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये ही मार्गिका सार्वजनिक – खासगी सहभागातून उभारण्याचा निर्णय घेत यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला. त्यानुसार मेट्रो ८ मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प आराखडा सिडकोच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे.
सिडको भागधारकांशी सहकार्य करून आवश्यक त्या मंजुरी मिळवेल. या प्रकल्पाची जबाबदारी आपल्याकडे आल्यानंतर आता प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या सविस्तर प्रकल्प आराखड्याचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी मंगळवारी निविदा जारी केली आहे. सल्लागाराची नियुक्ती करून पुनरावलोकन मार्गी लावून मेट्रो ८ मार्गिकेचे बांधकाम आणि संचलनासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचे सिडकोचे नियोजन आहे.