मुंबई : राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणात सर्वात आधी परवडणाऱ्या घरांना प्राधान्य देण्यात आले आहे. परवडणाऱ्या घरांची अधिकाधिक निर्मिती करून ती सर्वसामान्यांना वितरीत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार म्हाडा परवडणाऱ्या घरांची निर्मिती करीत आहे. तर सिडकोकडूनही मोठ्या संख्येने घरांची निर्मिती केली जात आहे. मात्र सिडकोची घरे महाग आहेत, ती लोकांना परवडत नाहीत, अशी कबुली उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
म्हाडा कोकण मंडळाच्या ५२८५ घरांसह ७७ भूखंडांसाठी शनिवारी ठाण्यातील डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत पार पडली. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. सिडकोला घरांच्या किंमती कमी करण्यास सांगितल्या आहेत. लवकरच सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होतील आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होतील, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
कोकण मंडळाच्या ५२८५ घरांसह ७७ भूखंडांसाठी शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. या सोडतीत एक लाख ५८ हजारांहून अधिक अर्जदार सहभागी झाले होते. या सोडतीतील २० टक्के सर्वसमावेश योजनेतील ५६४ घरांसाठी एकूण अर्जांच्या ९३ टक्के अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे या घरांसाठीच सोडतीत मोठी चुरस होती. या सोडतीत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण न झालेल्या अर्जदारांनी नाराज न होता, पुढील सोडतीत प्रयत्न करावा. तुमच्यासाठी आम्ही पुढे सोडत घेऊन येणारच आहोत, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी अयशस्वी अर्जदारांना आश्वासित केले. पूर्वी म्हाडाच्या घरांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पण आता मात्र म्हाडाच्या बांधकामाचा दर्जा चांगला झाल्याने लोकांचा म्हाडावरील विश्वास वाढत आहे, अशा शब्दात म्हाडाच्या कामाचे कौतुक केले.
तर मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्यासाठी म्हाडा, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सिडको, एमआयडीसीकडे सोपविल्या आहेत. विकासक प्रकल्प पूर्ण करीत नसून झोपडीधारकांना घरभाडे देत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन तीन वर्षांचे घरभाडे दिल्यानंतरच विकासकाला प्रकल्प देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्याची महायुतीच्या सरकारने अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे आता झोपु योजना योग्य प्रकारे मार्गी लागतील, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्यात येतील, असे आश्वासन देत त्यांनी इच्छुकांना दिलासा दिला.
समूह पुनर्विकासातून सात वर्षांत मुंबईत दोन लाख घरे
सर्वसामान्यांना परवडणारे घरे देण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. त्यांचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी म्हाडा येत्या काही वर्षात पूर्ण करेल, असा विश्वास यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला. मुंबईत सध्या नवीन घरे बांधण्यासाठी जागा नसली तरी पुनर्विकासाच्या, त्यातही समूह पुनर्विकासाद्वारे मुंबईकरांसाठी अधिकाधिक घरे कशी उपलब्ध होतील यासाठी म्हाडाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मोतीलाल नगर पुनर्विकास, अभ्युदयनगर, वांद्रे रेक्लमेशन, आदर्शनगर, पीएमजीपी काॅलनी पुनर्विकास, कामाठीपुरा पुनर्विकास, जीटीबी नगर पुनर्विकास यासह अन्य काही पुनर्विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत.
या पुनर्विकासाच्या माध्यमातून येत्या सात वर्षांत दोन लाख घरे सोडतीसाठी उपलब्ध होणार असल्याचेही यावेळी जयस्वाल यांनी सांगितले. तर एमएमआर ग्रोथ हबअंतर्गत ३० लाख घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून यातील आठ लाख घरांच्या निर्मितीची जबाबदारी म्हाडावर आहे. ही जबाबदारी म्हाडा योग्यरित्या पार पाडेल. म्हाडा पुढील पाच वर्षांत आठ लाख घरे बांधून पूर्ण करतील, असा विश्वासही जयस्वाल यांनी यावेळी व्यक्त केला.