लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : म्हाडाच्या माध्यमातून अधिकाधिक परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी म्हाडा कटिबद्ध असल्याचे आश्वासन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले. शुक्रवारी म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांच्या सोडतपूर्व प्रक्रियेला अर्थात अर्जविक्री-स्वीकृतीला जयस्वाल यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
कोकण मंडळाच्या ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, परिसरातील ५३११ घरांसाठी शुक्रवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या सोडतीच्या अर्जविक्री, स्वीकृतीस जयस्वाल यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुरुवात करण्यात आली. आता इच्छुकांना १८ ऑक्टोबरपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज सादर करता येणार आहेत. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून ७ नोव्हेंबरला सोडत काढण्यात येणार आहे.
आणखी वाचा-कुर्ल्यात एसआरए इमारतीला भीषण आग, ३९जण घुसमटले
मे महिन्यात कोकण मंडळाकडून काढण्यात आलेल्या ४६५४ घरांच्या सोडतीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. निम्म्याहून अधिक घरे विकलीच गेली नाहीत. यात मोठ्या संख्येने विरार-बोळींजमधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील घरांचा समावेश आहे. मोठ्या संख्येने विक्रीअभावी घरे रिकामी राहिल्याने कोकण मंडळाने या घरांसाठी पुन्हा सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. मे महिन्याच्या सोडतीतील शिल्लक घरांमध्ये इतर उपलब्ध घरांची दरम्यानच्या काळात भर पडली. त्यानुसार कोकण मंडळाने एकूण ५३११ घरांची जाहीर प्रसिद्ध केली आहे. यावेळी मात्र या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी व्यक्त केला आहे.
आणखी वाचा-मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर शासकीय कर्मचाऱ्यांची निदर्शने; संरक्षण देणारी तरतूद रद्द
या सोडतीतील सर्व घरे परवडणारी आहेत. तर आता अनामत रक्कम कमी करण्यात आली आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान आवास योजनेतील घरांसाठी आता वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लाख रुपयांवरुन सहा लाख रुपये करण्यात आली आहे. विरार-बोळींजमधील घरे पिण्याच्या पाण्याच्या समस्येमुळे विकली गेलेली नाहीत. पण आता मात्र पाण्याची समस्या लवकरच दूर होणार आहे. सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे त्यावेळी सोडतीला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास कोकण मंडळाला आहे.