मुंबई : म्हाडाच्या छत्रपती संभाजी नगर मंडळ आणि नाशिक मंडळातील एकूण १,४१८ सदनिकांसह भूखंडांच्या विक्रीसाठी नुकतीच एकत्रित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार या दोन्ही मंडळातील १,४१८ घरांच्या, भूखंडांच्या सोडतीसाठी सोमवारपासून नोंदणी, अर्जविक्री – स्वीकृतीस सुरुवात झाली आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सोमवारी सोडतपूर्व प्रक्रियेस सुरुवात झाली. या प्रक्रियेनुसार इच्छुकांना १२ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. या सोडतीद्वारे इच्छुकांना नाशिक आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
नाशिक मंडळाला २० टक्के सर्वसमावेश योजनेतून ६३ घरे उपलब्ध झाली आहेत. या ६३ घरांसह म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४ घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजी नगरमधील १,३५१ सदनिकांसह भूखंडाची सोडत काढण्यात येणार आहे. या दोन्ही मंडळांतील घरांच्या सोडतीसाठी म्हाडाकडून एकत्रित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकत्रित नोंदणी, अर्जविक्री – अर्जस्वीकृती प्रक्रिया राबवली जात आहे. सोडतपूर्व प्रक्रियेस अर्थात नोंदणी, अर्जविक्री – स्वीकृतीस सोमवारपासून सुरुवात झाली असून https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर इच्छुकांना आपले हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्ज भरता येणार आहे.
३० जूनपासून सुरू झालेली सोडतपूर्व प्रक्रिया १२ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. तर १८ ऑगस्ट रोजी अर्जदारांची प्रारुप यादी, २५ ऑगस्ट रोजी पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर सोडत काढण्यात येणार आहे. मात्र म्हाडाकडून सोडतीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच सोडतीची तारीख, वेळ आणि स्थळ जाहीर केले जाणार आहे.
नाशिकमधील ३१ व्यावसायिक भूखंडांची विक्री
म्हाडाच्या नाशिक विभागीय मंडळाच्या अखत्यारितील ३१ व्यावसायिक भूखंडांचा ई लिलाव केला जाणार आहे. त्यानुसार या ई लिलावासाठीची जाहिरात प्रसिद्ध करून सोमवारी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात करण्यात आली आहे. ३० जून ते २९ जूलैदरम्यान इच्छुकांना अर्ज सादर करता येणार असून या भूखंडांचा ई लिलावाचा निकाल ७ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. या भूखंडांच्या ई लिलावासाठी इच्छुकांना https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या संकेतस्थळावरील Lottery>;Eauction>;eauction या पोर्टलवर अर्ज करता येईल.